एमआयडीसीचे १३४ भूखंड धोक्यात
एमआयडीसीचे १३४ भूखंड धोक्यात
उद्योग सुरू न केल्यास ताबा घेणार; ठाणे-२ प्रादेशिक कार्यालयाची कारवाई सुरू
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : औद्योगिक विकासाच्या उद्देशाने वाटप करण्यात आलेल्या भूखंडांवर उद्योग सुरू न करणाऱ्या धारकांविरुद्ध महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कारवाईचा बडगा उगारला आहे. अंबरनाथ, कल्याण, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये केलेल्या पाहणीअंती तब्बल १३४ भूखंडांवरील उद्योग बंद स्थितीत असल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत उद्योजकांना विकसित औद्योगिक भूखंडांचे वाटप केले जाते. करारातील अटी व शर्तीप्रमाणे भूखंडधारकांनी निश्चित कालावधीत आवश्यक शासकीय परवानग्या मिळवून उद्योग सुरू करणे आणि प्रत्यक्ष उत्पादनात करणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित १३४ प्रकरणांमध्ये उद्योग सुरू न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे-२ प्रादेशिक कार्यालयाच्या पथकाने संबंधित क्षेत्रांत पाहणी व सर्वेक्षण मोहीम राबवली. पाहणीनंतर निष्क्रिय भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करारनामा व लागू नियमांनुसार निर्धारित मुदतीत उद्योग सुरू न केल्यास किंवा भूखंडाचा उद्देशपूर्ण वापर न केल्यास तो ताब्यात घेण्याची तरतूद आहे.
‘मिलाप’ पोर्टलवरून होणार नवीन वाटप
विहित कालावधीत समाधानकारक खुलासा न मिळाल्यास किंवा प्रत्यक्ष उत्पादन सुरू न झाल्यास संबंधित भूखंड एमआयडीसी ताब्यात घेणार आहे. त्यानंतर नियमावलीनुसार व पारदर्शक पद्धतीने हे भूखंड ‘मिलाप’ पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने पात्र व गरजू उद्योजकांना पुनर्वाटप केले जाणार आहेत. या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रातील निष्क्रिय भूखंडांचा प्रभावी वापर होऊन स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि औद्योगिक विकासास गती येईल, अशी माहिती ठाणे-२ प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

