सामान्य गृहिणी ते गंभीर गुन्हा; पैशाच्या आमिषाने गरजू महिलांचे शोषण,
पैशाच्या प्रलोभनाने गरजू महिलांचे शोषण
एका महिलेकडून अनेकदा बेकायदा स्त्रीबीज निर्मिती!
बदलापूर, ता. २१ (बातमीदार)ः बदलापुरात एका धक्कादायक आणि संवेदनशील प्रकरणाचा उलगडा झाला आहे. बदलापुरात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर यांच्या निवासस्थानी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक व बदलापूर पूर्व पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या छापेमारीत आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे स्त्रीबीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन व वैद्यकीय ड्रग्सचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर (बदलापूर) तसेच मंजुषा वानखेडे आणि अश्विनी चाबुकस्वार (उल्हासनगर) या तिन्ही महिलांना शनिवारी (ता. २१) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपी महिला या सामान्य गृहिणी असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपी महिला आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना हेरून त्यांच्याकडून बेकायदा स्त्रीबीज निर्मितीचे काम करून घेत होत्या. संबंधित महिलांना इंजेक्शन देऊन त्यांच्या बीजांडकोशात एकापेक्षा अधिक स्त्रीबीजे तयार करण्याचा प्रयत्न केला जात होता. यासाठी गरजू महिलांना प्रति वेळ सुमारे २५ हजार रुपये दिले जात, तर मध्यस्थ महिलांना अधिक आर्थिक फायदा मिळत होता. केवळ पैशाच्या मोहापायी हा गंभीर गुन्हा केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नियमानुसार आयुष्यात फक्त एकदाच स्त्रीबीज देण्याची परवानगी असताना, या प्रकरणात काही महिलांनी वेगवेगळी नावे व बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक वेळा बेकायदा पद्धतीने घरीच खोटे आयव्हीएफ तंत्रज्ञान तयार करून स्त्रीबीज विक्री केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात केवळ आरोपी महिलाच नव्हे, तर मोठी रुग्णालये, आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटर तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आरोपींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्याचे धागेदोरे देशपातळीवर किंवा परदेशापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील व गरीब वस्त्यांतील महिलांना पैशाचे प्रलोभन दाखवून या जाळ्यात ओढले जात असल्याचेही समोर आले आहे. बदलापूर आणि वांगणी परिसरातील महिलांचा यात सहभाग असण्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
संबंधित महिलांकडून माहिती घेतल्यानंतर बदलापूर, विठ्ठलवाडी आणि ठाणे येथे छापे टाकून सुमारे १० लाखांचे ड्रग्स व इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. हा प्रकार बेकायदा असून, आरोपी महिलांची सखोल चौकशी करण्यासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जातात का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानंतर येत्या काही दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात येईल.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

