औषधे बाहेरून का? महापौरांचा प्रशासनाला जाब
औषधे बाहेरून का? महापौरांचा प्रशासनाला जाब
राजावाडी रुग्णालयात पाहणी; लसींचा अखंडित साठा राखण्याचे निर्देश
घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील राजावाडी रुग्णालय येथे शनिवारी (ता. २१) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भेट देत आरोग्यसेवा, स्वच्छता, औषधपुरवठा आणि सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी प्रशासनाला स्पष्ट व कडक निर्देश देत रुग्णसेवा अधिक परिणामकारक आणि पारदर्शक करण्यावर भर दिला.
महापौरांनी महिला व पुरुष वैद्यकीय कक्ष, प्रसूती कक्ष, प्रसूतीपूर्व विभाग, बालरोग विभाग तसेच पुरुष शल्यचिकित्सा कक्षाला भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला. रुग्णांकडून मिळालेल्या अभिप्रायातून काही गंभीर तक्रारी पुढे आल्या. विशेषतः “रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात” या तक्रारीची त्यांनी तातडीने दखल घेत औषध व लसींच्या पुरवठा-वितरणाच्या नोंदी तपासल्या.
लसीकरण अखंडित आणि नियमित राहावे यासाठी आवश्यक साठा राखण्याचे आदेश देत पुरवठा साखळीत येणाऱ्या अडथळ्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले. दुर्धर आजारांवरील इंजेक्शनचा पुरवठा का होत नाही, याची माहिती अधिष्ठातांकडून मागवून संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील काम संथ गतीने सुरू असल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महापौरांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम परिसर पूर्णपणे आच्छादित करणे तसेच धूळ प्रदूषण टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
अन्नपुरवठ्याच्या थाळी पद्धतीतील दर्जा सुधारण्याचे निर्देश देत “रुग्णांना पौष्टिक व स्वच्छ आहार मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जुनी वायरिंग बदलून नवीन बसविणे, आवश्यक तेथे रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले.
या पाहणीदरम्यान स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. पवार तसेच वैद्यकीय अधीक्षिका डॉ. भारती राजूलवाला उपस्थित होत्या. महापौरांच्या या आकस्मिक भेटीनंतर राजावाडी रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि पारदर्शक होईल का, याकडे घाटकोपरकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

