मोठागाव सर्कल–माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे बससेवेचा प्रस्ताव

मोठागाव सर्कल–माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे बससेवेचा प्रस्ताव

Published on

डोंबिवलीकरांचा ठाणे प्रवास होणार सुखकर
मोठागाव सर्कल-माणकोली उड्डाण पूलमार्गे बससेवेचा प्रस्ताव
नवीन बस दाखल झाल्यानंतर सर्वेक्षण; लोकलमधील गर्दी कमी करण्यास मदत होणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ ः डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव सर्कल ते माणकोली उड्डाणपूलामार्गे ठाणे शहराला जोडणारी थेट बससेवा सुरू करण्याबाबत ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यामुळे लोकलमधील गर्दीला आता पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
लोकल रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रोजच्या प्रवासात वेळेवर पोहोचण्याच्या घाईत प्रवासी दरवाज्याला लोंबकळत प्रवास करतात. गर्दीचा ताण, तोल जाणे किंवा दारातून ढकलले जाणे यामुळे अनेकदा गंभीर अपघात होतात. अशा दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पर्यायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, तसेच लोकलमधील गर्दी कमी व्हावी यासाठी मोठागाव सर्कल-माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे माजिवडा व घोडबंदर परिसराशी जोडणारी बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रस्तावित मार्गाचे सविस्तर सर्वेक्षण करून प्रवाशांच्या सोयीचा विचार करण्यात येईल आणि त्यानंतर बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे परिवहन उपक्रमाकडून कळविण्यात आले आहे.

अर्ध्या ते पाऊण तासात ठाणे
ही बससेवा सुरू झाल्यास प्रवासी रिक्षाने मोठागाव सर्कल येथे पोहोचून रेल्वे फाटक किंवा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळून थेट ठाण्याला जाऊ शकतील. ही सेवा सुरू झाल्यास प्रवासी अर्ध्या ते पाऊण तासात ठाणे येथे पोहोचू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेथून पुढे मुंबई आणि इतर इच्छित ठिकाणी प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. या सेवेमुळे ठाणे परिसरात नोकरी करणारे नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लवकरच होणार मार्गाचे सर्वेक्षण
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव सर्कल ते माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे शहराशी जोडणारी बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम याच्या ताफ्यात लवकरच काही नवीन बस दाखल होणार असून त्यानंतर मोठागाव ते ठाणे या प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण करून बससेवा सुरू करण्याचा पुढाकार घेण्यात येणार असल्याचे परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी स्पष्ट केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com