कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ
कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट रुपडे पालटणार
सुशोभिकरणासाठी निधी मंजूर ः रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभिकरणाचे उद्घाटन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २२) करण्यात आले. भाजपच्या नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकासकामाला सुरुवात होत आहे.
कल्याण-डोंबिवलीला खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभिकरण व्हावे यासाठी रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या. या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण करून रुपडे पालटणार आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

