ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला
‘बिश्नोई ग्रुप’च्या नावाने खंडणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे ‘बिश्नोई ग्रुप’च्या नावाने १० कोटींची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिक ११ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पूजेसाठी कुटुंबासह मध्य प्रदेश येथील जिल्हा सतनामधील शिवराजपूर येथे गेले होते. त्याच दिवशी त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. मात्र, पूजा कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी कॉल स्वीकारला नव्हता. त्यानंतर पुन्हा सायंकाळी संबंधित क्रमांकावरून कॉल आला. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने स्वतःला बिश्नोई ग्रुपमधून बोलत असल्याचे सांगत, १० कोटी रुपये पाठवा अन्यथा ठार मारू, अशी धमकी दिली. तसेच पोलिसांकडे तक्रार केली तर ‘एन्काउंटर’ करण्याची धमकी दिल्याचे सांगितले आहे. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव सांगण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदारांनी कॉल कट केला. तसेच, शुक्रवारी (ता. २०) तक्रारदार हे ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कार्यालयात असताना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून चार व्हॉट्सअॅप कॉल आले. संशय आल्याने त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यानंतर संबंधित क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर धमकीचा ऑडिओ क्लिप पाठविण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत अनोळखी व्यक्तिविरोधात खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल केला आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा तपास सुरू केला असून, सायबर सेलची मदत घेतली जात आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

