पालघर जिल्ह्यात 9 आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रांना राष्ट्रीय मानांकन
आरोग्य संस्थांना राष्ट्रीय मानांकन
जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक संपन्न
पालघर, ता. २२ (बातमीदार) : पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील जामसर, नांदगाव, साकुर व साखरशेत ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे; विक्रमगड तालुक्यातील तलवाडा; वसई तालुक्यातील भाताणे; तलासरी तालुक्यातील आमगाव; तसेच डहाणू तालुक्यातील पोलवड या प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. जव्हार हा आकांक्षित तालुका असून, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळालेला तो जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, आरएमओ डॉ. योगेश सुराळकर, डीआरसीएचओ डॉ. वैदही माळवी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन वाघमारे, जिल्हा नोडल अधिकारी (एनक्यूएएस) तथा प्रभारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रांजली सावे यांसह सर्व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्यूएएस) हा भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, औषध व साधनसामग्री व्यवस्थापन, रुग्ण तपासणी प्रक्रिया, रुग्ण समाधान, स्वच्छता व सुरक्षितता आदी बाबींचे सखोल मूल्यमापन करून मानांकन दिले जाते. डहाणू तालुक्यातील सामवन प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय मानांकनासाठी अर्ज सादर केला असून, आयुष्मान आरोग्य मंदिर न्याहाळे खुर्द यास राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अन्य २३ आयुष्मान आरोग्य मंदिरांना राज्यस्तरीय मानांकन मिळाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता पथकाचे विशेष कौतुक केले. या यशामध्ये डॉ. सागर पाटील, डॉ. किरण पाटील तसेच डॉ. प्रांजली सावे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे यश साध्य झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांचे अभिनंदन केले.
-----------------
राष्ट्रीय मानांकनाची प्रमाणपत्रे संबंधित आरोग्य संस्थांना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी त्यांनी सांगितले की, हे मानांकन केवळ गुणांचे मोजमाप नसून रुग्णकेंद्रित, सुरक्षित व शिस्तबद्ध आरोग्य सेवा देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. जिल्ह्यातील आरोग्यसेवा राष्ट्रीय दर्जाची असल्याचे हे प्रतीक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

