‘हमारा गाव’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवक प्रशिक्षण उत्साहात

‘हमारा गाव’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवक प्रशिक्षण उत्साहात

Published on

विक्रमगडमध्ये ‘हमारा गाव’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवक प्रशिक्षण उत्साहात

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल (पी आणि जी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘हमारा गाव’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांचे विशेष प्रशिक्षण शिबिर विक्रमगड येथे यशस्वीरीत्या पार पडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक पातळीवर सक्षम स्वयंसेवक घडविणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणादरम्यान गावा-गावांत सुरू असलेल्या ‘चिल्ड्रन क्लब’मधील मुलांना दिल्या जाणाऱ्या कार्य व प्रकल्प समजावून देताना स्वयंसेवकांनी कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करावे, मुलांशी संवाद साधावा, त्यांच्या शंका कशा दूर कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी कशी करावी, तसेच जबाबदारीपूर्वक कार्यक्रम राबविण्याचे तंत्र यावरही भर देण्यात आला.
प्रशिक्षण अधिक परिणामकारक व्हावे, यासाठी स्वयंसेवकांना गटांमध्ये विभागून प्रत्यक्ष कृती (सीआयएम) पद्धतीद्वारे प्रात्यक्षिके घेण्यात आली. या माध्यमातून चिल्ड्रन क्लबमधील उपक्रम प्रत्यक्षात कसे राबवायचे, मुलांचा सहभाग कसा वाढवायचा आणि शिक्षण अधिक रंजक कसे बनवायचे, याचे मार्गदर्शन देण्यात आले.
स्थानिक स्तरावर स्वयंसेवकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘शिक्षणाच्या बदल्यात शिक्षण’ (ईईई) या कोर्सअंतर्गत लाय एसफी (यंग लीडर्स प्रोग्राम) हा कोर्स देण्यात आला होता. आता पुढील टप्प्यात स्वयंसेवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)विषयक कोर्स सुरू करण्यात आला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण प्रक्रियेत कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नव्या युगातील कौशल्यांची ओळख होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रथम एज्युकेशन फाउंडेशन विक्रमगडचे टीम लीडर प्रदीप वारंगडे तसेच मुकेश लहांगे, नितेश काकड, हेमंत मेथवाले, दिलदार फडवले, राजेश तारवी, भावेश खरपडे, रविना फरारा, पूनम कुऱ्हाडा आणि सुवर्णा वावरे आदी उपस्थित होते.
‘हमारा गाव’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून उभारला जाणारा हा शैक्षणिक पूल आगामी काळात अधिक बळकट होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com