

संघर्षमय आयुष्याला ‘जीवाची मुंबई’ची हसरी फुंकर
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांची तीन दिवसांची आनंदयात्रा
नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : एक वर्षाची मुलगी असताना नापिकी आणि डोक्यावर कर्ज झाल्याने नवऱ्याने आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी दूर केलं. ३० वर्षांच्या आम्रपाली रामटेके आज मुलीला घेऊन एकटी राहतात. परिस्थितीशी संघर्ष करत घर चालवतात. आम्रपाली यांनी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई पाहिली, समुद्र पाहिला, सिनेमाचे शूटिंग बघितले. ‘जीवाची मुंबई’ या उपक्रमातून आम्रपाली यांच्यासारख्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील ३० विधवा महिलांना तीन दिवसांची आनंदयात्रा घडविण्यात आली.
डोळ्यांत संघर्षाच्या आठवणी, खांद्यावर जबाबदारी आणि मनात दडलेले असंख्य प्रश्न... नवऱ्याच्या मृत्यूनंतर आयुष्याचा सारा भार खांद्यावर घेतलेल्या या महिलांसाठी आनंद म्हणजे जणू हरवलेली गोष्टच. पण काही क्षणांसाठी का होईना आयुष्याच्या या कडू वास्तवावर जीवाची मुंबई ता उपक्रमाने हसऱ्या आठवणींची फुंकर घातली.
यवतमाळ येथील रसिकाश्रय संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जातो. पहिल्या वर्षी निराधार वृद्धांना, दुसऱ्या वर्षी घरगुती काम करणाऱ्या महिलांना विमानवारीचा अनुभव देण्यात आला होता. या वेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना मुंबई अनुभवण्याची संधी मिळाली. तीन दिवसांच्या या सहलीत महिलांनी आयुष्यभर न पाहिलेल्या जगाचा अनुभव घेतला.
अलिबाग येथे समुद्रसफरीचा आनंद घेताना अनेकांच्या चेहऱ्यावर बालसुलभ उत्साह उमटला. लाटा पाहून, हातात हात घेऊन हसताना काही क्षणांसाठी दुःख विसरले जणू. कुलाबा किल्ल्याची सफर, समुद्राच्या लाटांशी खेळणे आणि एकमेकांसोबत हसत, गप्पा मारत घालवलेले क्षण त्यांच्या आयुष्यातील वेदनांवर काही क्षणांची फुंकर ठरले.
मुंबई दर्शनाचा अनुभव
गेटवे ऑफ इंडिया, मणी भवन आणि हाजी अली दर्गा येथे त्यांनी भेट दिली. या वेळी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेताना मनातली चिंता आणि दुःखाची सावली काही काळासाठी हलकी झाली.
राज ठाकरेंची भेट
सहलीच्या शेवटच्या दिवशी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट झाली. राज ठाकरे यांनी महिलांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या ऐकल्या. आर्थिक मदतीचा हात समोर केला. कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी या महिलांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
सिनेमॅटिक आनंद
त्यानंतर या महिलांनी फिल्म सिटीमध्ये विविध कलाकारांच्या भेटी घेत आनंदाचे क्षण अनुभवले. अभिनेते-खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘मी सावित्री जोतिबा फुले’ मालिकेच्या सेटवर महिलांसोबत शिवजयंती साजरी केली.
२०१६मध्ये पतीने आत्महत्या केली तेव्हा दोन्ही मुलं खूप लहान होती. दोन एकर शेती आणि कर्ज या वेळी कुणीच साथ दिली नाही. मजुरी करीत मुलांना वाढवलं. आज मोठा मुलगा बारावीला आणि छोटा दहावीत आहे. संघर्ष आमच्या आयुष्याचा भाग झाला आहे; पण हार मानायची नाही, ही जिद्द अजून आहे.
- सपना पाटील, पिंपरी पवना, वर्धा
आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई पाहिली, समुद्र पाहिला, मोठ्या लोकांना भेटले. हा आनंद आयुष्यभर विसरणार नाही.
- आम्रपाली रामटेके, घाटंजी, यवतमाळ
२०११मध्ये पती गेल्यावर चार मुलांचा संसार माझ्या खांद्यावर आला. मजुरी करीत मुलांना वाढवलं. या सगळ्या संघर्षात स्वतःसाठी आनंदाचा क्षणही मिळाला नव्हता; पण या सहलीने आयुष्यातील विसरलेला आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला.
- वर्षा डफ, राळेगाव, यवतमाळ
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना घेऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतोय. या महिलांच्या आयुष्यातील वेदना कमी करता येणार नाहीत; पण आनंदाचे चार क्षण त्यांच्या पदरात टाकण्याचा हा प्रयत्न आहे.
- महेश पवार, संयोजक, जीवाची मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.