इतिहासाच्या प्रेरणेने उजळली शिवजयंती

इतिहासाच्या प्रेरणेने उजळली शिवजयंती

Published on

इतिहासाच्या प्रेरणेने उजळली शिवजयंती

वाणगाव, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील एम. के. कनिष्ठ महाविद्यालय, चिंचणी येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत इतिहासाविषयी अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. सुधीर भांडवलकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी साम्राज्याचा तेजस्वी इतिहास प्रभावी शैलीत सांगितला. इतिहासातून प्रेरणा घेतल्याशिवाय उज्ज्वल भविष्य घडू शकत नाही, तसेच इतिहास विसरणारी व्यक्ती आणि समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही, असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल नव्याने जिज्ञासा आणि अभिमान निर्माण झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सूरज आष्टेकर होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन करीत महाराजांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य निर्मितीचा संघर्ष विद्यार्थ्यांसमोर जिवंतपणे उभा केला. तसेच प्रा. मेघा पाटील यांनी ‘शिवजल’ योजनेविषयी माहिती देत जलसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. एकनाथ पाटील यांनी केले, तर प्रा. लहू महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी प्रीती राऊत, वंदना सरोदे, वैशाली महाजन आदी प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचे मूल्य समजून घेण्याची प्रेरणा मिळाली. शिवजयंतीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Marathi News Esakal
www.esakal.com