बनावट कागदपत्रांनी बँकेला सात कोटींचा गंडा
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : सीबीडी बेलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सरकारी कंपन्यांचे बनावट ओळखपत्र आणि वेतन प्रमाणपत्र सादर करून ५१ बनावट वैयक्तिक कर्ज खातेधारकांनी बँकेची तब्बल सहा कोटी ९० लाखांची फसवणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी बेलापूर पोलिसांनी या प्रकरणातील तीन मुख्य सूत्रधार व ५१ बनावट कर्जधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
बँकेच्या फसवणुकीमागे येमनाथ नाईक राठोड, सद्दाम अली शेख आणि त्यांना ही कामे देणारा राजू नायके जाटोथु यांचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. येमनाथ हा सीआरपीएफमध्ये कामाला असून, तो तेथील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कर्जाच्या फाइल्स एसबीआय बँकेत मंजुरीसाठी घेऊन जात होता. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांशी त्याची चांगली ओळख झाली होती. त्यानंतर त्याने ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत ५१ व्यक्तींच्या नावे बनावट फाइल्स तयार करून बँकेकडून तब्बल सहा कोटी ९० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले.
कर्ज मंजूर झाल्यानंतर राठोड व त्याच्या सहकाऱ्यांनी काही महिने कर्जाचे हप्ते भरून बँकेचा विश्वास संपादन केला. मात्र, काही काळाने या खात्यांमध्ये पगार जमा होणे बंद झाले. त्यामुळे कर्ज खाती थकीत (एनपीए) होऊ लागल्यानंतर बँकेला या कर्ज खात्यांबाबत संशय आला. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी संबंधित कर्जदारांच्या निवासी पत्त्यावर जाऊन तपासणी केली असता, ५१ पैकी एकही कर्जदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
सरकारी कंपन्यांच्या नावाने बनावटगिरी
कर्जधारकांनी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी देशातील अग्रगण्य सरकारी कंपन्यांचा आधार घेतला. यात गेल, भेल, सेल, ओएनजीसी, आयओसीएल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, बीएसएनएल आणि एनएचएआय कंपन्याचा समावेश असून, या कंपन्यांचे बनावट ओळखपत्र आणि वेतन प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. बँकेने संबंधित कंपन्यांच्या हैदराबाद, मुंबई कार्यालयांकडे चौकशी केली असता, यातील एकही कर्जदार त्यांच्याकडे कामाला नसल्याचे स्पष्ट झाले.
हप्ते भरून डोळ्यात फेकली धूळ
बँकेने नवीन फाइल्स स्वीकारणे थांबवले, तसेच खाती एनपीए होऊ लागल्यानंतर येमनाथ राठोड हा स्वत: काही खात्यांमध्ये किमान रक्कम जमा करून बँकेची दिशाभूल करत होता. मात्र, अनियमित खात्यांची संख्या वाढल्यानंतर बँकेने या बनावट कर्ज खातेदारांबाबत माहिती घेतल्यांनतर त्याचे पितळ उघडे पडले. त्यानंतर बँकेच्या अधिकारी अंजना बारा यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

