मुंबईतील कारवाईचा फटका एपीएमसीत बाजारावर
वाशी, ता. २२ (बातमीदार) : मुंबई शहरात पदपथावरील फेरीवाल्यांवर गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा थेट परिणाम भाजीपाला बाजारावर झाला आहे. पदपथावर भाजीविक्री करणारे अनेक विक्रेते सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट येथील घाऊक बाजारात भाजी घेण्यासाठी येत नसल्याचे चित्र आहे.
सध्या भाज्यांसाठी पोषक हवामान असल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, फेरीवाल्यांची खरेदी घटल्याने आणि अपेक्षित उठाव नसल्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाला पडून राहण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीचा परिणाम थेट भावांवर दिसून येत असून, भाजीपाल्याच्या भावात सरासरी २० ते ३० टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, दोडका, गवार यांसारख्या भाज्यांचे भाव कमी झाले आहेत.
भाजीपाला विक्रेते शंकर पिंगळे यांनी सांगितले की, पदपथावरील कारवाईमुळे किरकोळ विक्रेते बाजारात येत नाहीत. त्यातच आवक जास्त असल्याने माल विक्री न होता पडून राहत आहे. परिणामी भाव कोसळले आहेत. एकीकडे ग्राहकांना कमी भावांचा फायदा होत असला तरी दुसरीकडे शेतकरी आणि घाऊक व्यापाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. येत्या काही दिवसांत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच राहिल्यास बाजारातील ही मंदी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

