कोसबाडमध्ये बहरला ‘बिजली’चा मळा

कोसबाडमध्ये बहरला ‘बिजली’चा मळा

Published on

कोसबाडच्या कृषी पंढरीत ‘बिजली’ फुलली
पालघरच्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाची नवी संधी
वाणगाव, ता. २२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना पारंपरिक पिकांसोबतच नगदी पिकांचा पर्याय देण्यासाठी डहाणू तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे ‘बिजली’ फुलांच्या लागवडीचा प्रात्यक्षिक प्रयोग यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि झेंडूसारखी दिसणारी ही फुले सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, कृषी क्षेत्रात हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.

कृषी विज्ञान केंद्राने हा प्रयोग केवळ लागवडीपुरता मर्यादित न ठेवता त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. २५ ते ३० दिवसांच्या रोपांची ३० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करण्यात आली. प्लॅस्टिक मल्चिंगमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी झाला आणि पाण्याची बचत साधली गेली. जमिनीची मशागत करताना कुजलेले शेणखत आणि सेंद्रिय खतांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. ठिबक सिंचन आणि कीडरोग व्यवस्थापनामुळे पिकाची वाढ जोमदार झाली असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

बिजलीची फुले ही टिकाऊ आणि आकर्षक असतात. ही फुले तोडणीनंतर बराच वेळ ताजी राहत असल्याने वाहतुकीत नुकसान कमी होते. पूजा, सजावट, हार-माळा तसेच ‘ड्राय फ्लॉवर’ उद्योगात या फुलांना मोठी मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेसह शहरी भागातही या फुलांना चांगला दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते.

शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
हा मनमोहक फुलांचा ताटवा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी विद्यार्थी मोठ्या संख्येने कोसबाड येथे भेट देत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आगामी हंगामात या फुलांची लागवड करण्याची तयारी दर्शवली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर आणि प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग पूर्ण झाला आहे.

पारंपरिक पिकांसोबत फुलशेतीचा अवलंब केल्यास आर्थिक जोखीम कमी होते. ‘बिजली’ फुलांची लागवड लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पूरक व्यवसाय ठरू शकते. इच्छुक शेतकऱ्यांसाठी केंद्रामार्फत लवकरच प्रशिक्षण आयोजित केले जाईल.
- डॉ. विलास जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com