सिलेंडरच्या कारणावरून संतापाचा स्फोट
डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने हल्ला
सिलिंडर देण्यास उशीर झाल्याने वाद; इंदरानगर परिसरातील घटना, मुख्य आरोपीसह दोघे फरार
टिटवाळा, ता. २२ (वार्ताहर) : गॅस सिलिंडरची डिलिव्हरी वेळेत न मिळाल्याच्या रागातून एका ग्राहकाने आपल्या साथीदारांसह गॅस वितरण कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता. २१) रात्री ८च्या सुमारास इंदरानगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र शेजूळ (वय ४०) हे गॅस सिलिंडर वितरणाचे काम करतात. शुक्रवारी रात्री काम संपवून ते आपले वाहन पार्क करत असताना याच परिसरातील रहिवासी राकेश शर्मा (वय २५) याने त्यांना अडवले. ‘‘सिलिंडर वेळेत का दिला नाही?’’ या कारणावरून राकेशने महेंद्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या राकेशने जवळ असलेला कोयता काढून महेंद्र यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात राकेशसोबत त्याचे अन्य दोन साथीदारही सामील होते. अचानक झालेल्या या हल्ल्यात महेंद्र शेजूळ हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिस (टिटवाळा) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून आरोपींची ओळख पटली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

