ठाणे बनला ड्रग्जचा अड्डा
ठाणे बनला ड्रग्जचा अड्डा
वर्षभरात ७८ कोटींचा साठा जप्त; २३७ कारवाया, ३५५ आरोपी जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : वेगाने शहरीकरण होत असलेल्या ठाणे शहरावर ड्रग्जमाफियांचे जाळे घट्ट होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत २०२५ या वर्षभरात अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तब्बल ७८ कोटी ४८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. २०२४च्या तुलनेत हा आकडा जवळपास पावणेपाचपट वाढल्याने ठाण्यात ड्रग्जचे सावट गडद होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५मध्ये एकूण २३७ कारवाया करण्यात आल्या. या कारवायांत ३५५ आरोपींना अटक करण्यात आली. मागील वर्षी १६२ गुन्ह्यांत २५० आरोपींना अटक करून सुमारे १६ कोटी ४५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. मात्र एका वर्षातच जप्तीचा आकडा झपाट्याने वाढल्याने ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती विस्तारत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबईलगत असलेले ठाणे हे स्थलांतर, वाढती लोकसंख्या, विकसित होत असलेली निवासी संकुले आणि सुलभ रस्ते, रेल्वे संपर्क यामुळे तस्करांसाठी सोयीचे ठिकाण ठरत असल्याची चर्चा आहे. विशेषतः ‘पार्टी ड्रग्ज’ आणि सिंथेटिक अमली पदार्थांचा वापर तरुणांमध्ये वाढत असल्याची बाब पोलिसांच्या रडारवर आहे.
विशेष मोहिमा
महाविद्यालयीन परिसर, नव्याने विकसित होणारे भाग आणि हाय प्रोफाइल वसाहतींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थविरोधी पथकांकडून पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. शाळा-महाविद्यालयांत जनजागृती कार्यक्रमांनाही गती देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
अमली पदार्थ कारवाईचा तक्ता
वर्ष गुन्हे /आरोपी जप्त मुद्देमाल (रु.)
२०२४ १६२ २५०
१६,४५, ४४,६९५
२०२५ २३७ ३५५
७८,४८,७१,४९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

