भिवंडीत प्रदुषणामुळे सर्दी खोकल्याचे आजार
भिवंडी प्रदूषणाच्या विळख्यात
धूळ, धुरामुळे श्वसनाचे विकार; पालिका प्रशासन व प्रदूषण मंडळाच्या दुर्लक्षावर संताप, नागरिक तापाने फणफणले
भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी शहरात वाढत्या वायू प्रदूषणामुळे ‘व्हायरल फिवर’सह विविध संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. डाईंग-सायजिंगमधून निघणारा विषारी धूर आणि रस्त्यांवरील धुळीचे साम्राज्य यामुळे शहरात आरोग्याचा आणीबाणीचा प्रसंग ओढवला आहे. सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेची आरोग्य केंद्रे, खासगी हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
शहरातील डाईंग आणि सायजिंग उद्योगांच्या चिमण्यांमधून रात्रंदिवस निघणाऱ्या काळ्याकुट्ट धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यातच शहरातील खड्डेमय रस्त्यांवर साचलेली माती वाहनांच्या वेगामुळे हवेत उडत असल्याने पादचाऱ्यांना नाका-तोंडावर रुमाल बांधल्याशिवाय चालणे कठीण झाले आहे. या धुळीमुळे शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडत आहेत.
महापालिका कर्मचारी आणि ठेकेदार अनेक भागांतून नियमित कचरा उचलत नसल्याने, नागरिक साचलेला कचरा रस्त्यावरच जाळत आहेत. यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे वायू प्रदूषणाची पातळी भयानक वाढली आहे. मात्र, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
घराघरांत आजारपणाचे सावट
रस्त्यावरील मातीची धूळ वाऱ्यामुळे थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे. धुळीच्या त्रासापासून वाचण्यासाठी महिला व नागरिक स्कार्फ आणि रुमाल बांधून फिरत आहेत. मात्र, प्रशासनाला ही धूळ दिसत नाही का, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत. सर्व रस्ते धुळीने व्यापलेले असल्याने संपूर्ण भिवंडीकर सध्या त्रस्त झाले आहेत.
महापौर व आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
शहरातील या गंभीर परिस्थितीकडे महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरी आणि आयुक्त अनमोल सागर यांनी तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषणकारी उद्योगांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

