बेकायदा इमारत होणार भुईसपाट

बेकायदा इमारत होणार भुईसपाट

Published on

बेकायदा इमारत होणार भुईसपाट
पालिकेची कारवाईची तयारी वेगात; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; ६ मार्चला तोडकाम, पोलिस बंदोबस्ताची मागणी

डोंबिवली, ता. २२ : शहरातील आयरे गाव, टावरीपाडा परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्स ही बेकायदा सातमजली इमारत जमीनदोस्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या दीड वर्षात दोन वेळा ही इमारत पाडण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर आता प्रशासनाने कारवाईसाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. तोडकामादरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पोलिस उपायुक्तांकडे कडक बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

आयरे गावामधील ही इमारत पूर्णपणे अनधिकृत असल्याचे सिद्ध झाले असून, पालिकेने यापूर्वीच भूमाफियांविरुद्ध एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या इमारतीत सध्या सुमारे ६० कुटुंबे वास्तव्यास आहेत. दरम्यान, न्यायालयाने रहिवाशांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत इमारत पाडण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी दोन-तीन वेळा पालिकेने कारवाईचा प्रयत्न केला होता, मात्र राजकीय हस्तक्षेप आणि रहिवाशांच्या विरोधामुळे तोडकाम थांबवावे लागले होते. या वेळी मात्र प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे नोंदवून कडक कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.

६५ बेकायदा इमारतींचे रॅकेट रडारवर
डोंबिवली परिसरातील अशाच प्रकारच्या ६५ बेकायदा इमारतींत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. भूमाफियांनी महारेराची बनावट प्रमाणपत्रे जोडून ग्राहकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. वास्तुविशारद संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या सर्व ६५ इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पुढील लक्ष्य ‘मल्हार हाईट्स’
समर्थ कॉम्प्लेक्सच्या कारवाईनंतर पालिकेचा मोर्चा शेजारील ‘मल्हार हाईट्स’ या बेकायदा इमारतीकडे वळणार आहे. यासंदर्भातही ‘ग’ प्रभाग प्रशासनाने रामनगर पोलिस ठाण्याला पत्र दिले असून, गुन्ह्याचा तपास वेगवान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीवर येत्या ६ मार्चला कारवाई करण्यात येईल. त्यानंतर तत्काळ मल्हार हाईट्स या बेकायदा इमारतीवरही हातोडा चालवला जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com