जिल्हा रुग्णालयाचा उकीरडा
ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा
ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; संसर्ग वाढण्याची भीती, तात्पुरत्या तंबू रुग्णालयात रुग्णांचे हाल
ठाणे शहर, ता. २२ : ठाणे जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण आदिवासी पाड्यातील नागरिक चांगल्या उपचाराकरिता ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र हे रुग्णालय सध्या कचऱ्याच्या उकिरड्याचे ठिकाण बनले आहे. रुग्ण उपचार घेत असलेल्या परिसरात वापरलेले हातमोजे आणि महिला रुग्णांचे पॅड उघड्यावर टाकले जात आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी असलेली स्वच्छतागृहेदेखील अस्वच्छ असल्याने ती आजार पसरवणारी ठिकाणे बनली आहेत.
ठाणे जिल्ह्यातील गरजू गरीब रुग्णांसाठी राज्य सरकारच्या वतीने विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालय चालविले जाते. पालघर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई जिल्ह्यातील गरजू गरिबांसाठी हे रुग्णालय मोठा आधार बनले आहे. रुग्णालयाची भव्य इमारत तयार आहे. या इमारतीत गरिबांवर मोफत सुपरस्पेशालिटी उपचार केले जाणार आहेत. मात्र त्याच्या उद्घाटनाला प्रचंड विलंब होत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्था वाईट होऊ लागली आहे. मनोरुग्णालय शेजारी स्थलांतरित करण्यात आलेल्या ठिकाणी उपचाराकरिता तंबू तयार केले असून, तेथे रुग्णांवर उपचार करणे कठीण झाले आहे. त्यातच तात्पुरते स्थलांतरित केलेल्या रुग्णालय परिसरात कचऱ्याचे ढीग जमा होऊ लागले आहेत.
उघड्यावर जमा केलेले हे ढीग येथेच जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही कचरा वर्गीकरण न करताच तो घंटागाडीमधून सामान्य पद्धतीने उचलून नेला जात आहे. उचललेला कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट न करता तो डम्पिंगवर टाकला जात आहे. हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचत आहे.
स्वच्छतेच्या अभावामुळे हे रुग्णालय आता आजार बरे करणारे केंद्र न राहता संसर्ग पसरवणारे ठिकाण बनले आहे. जिल्हा रुग्णालयाची नवीन भव्य इमारत तयार असली तरी तिच्या उद्घाटनाला होत असलेल्या विलंबामुळे सध्या रुग्णालय मनोरुग्णालयाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. येथे तंबू ठोकून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याच तंबूच्या अवतीभोवती वापरलेले हातमोजे, महिला रुग्णांचे पॅड्स आणि इतर कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
भीषण वास्तव
औषधालयाजवळ कचराकोंडी
आपत्कालीन विभाग आणि औषधालयाजवळच कचऱ्याचे ढीग लावले जात आहेत. हा कचरा तिथेच जाळला जात असल्याने धुराचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे.
विद्युत हाऊसमध्ये कचरा
जनरेटर रूममध्ये प्लॅस्टिक आणि कचऱ्याच्या गोणी ठेवल्या आहेत. येथे शॉर्टसर्किट झाल्यास भीषण आगीचा धोका निर्माण होऊ शकतो.
वॉर्डाबाहेर घाण
आपत्कालीन कक्षाशेजारी असलेल्या रुग्णांच्या वॉर्डाजवळच घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
रुग्णालय परिसरात गोठा
रुग्णालयाच्या पाठीमागे चक्क अतिक्रमण करून शेळ्यांचा गोठा थाटण्यात आला आहे.
चालकांचे हाल
रुग्णवाहिका चालकांसाठीच्या आरामगृहात कचरा साचल्याने चालकांना अस्वच्छतेतच विश्रांती घ्यावी लागत आहे.
स्वच्छतागृहांची दुरवस्था
बाह्य रुग्ण विभागातील स्वच्छतागृहे प्रचंड दुर्गंधीयुक्त असून, ती आजारांचे माहेरघर बनली आहेत.
भंगाराचे साम्राज्य
औषधालयासमोर वॉटर फिल्टर, व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि भंगार साहित्याचा ढीग साचला आहे.
थुंकीचा संसर्ग
अतिदक्षता विभागाच्या भिंतींवर गुटखा आणि तंबाखूच्या पिचकाऱ्या मारल्या असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.
महागड्या साहित्याची धूळ
परिचारिका प्रशिक्षण सभागृहाजवळ ऑक्सिजन टाक्या आणि जनरेटर यांसारखे महागडे साहित्य भंगाराप्रमाणे उघड्यावर पडून आहे.
नियम धाब्यावर बसवून कचऱ्याची विल्हेवाट
रुग्णालयातील कचऱ्याचे वर्गीकरण न करताच तो घंटागाडीत सामान्य कचऱ्याप्रमाणे टाकला जात आहे. बायो-मेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो डम्पिंग ग्राउंडवर फेकला जात असल्याने नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

