उकाडा वाढला, आजार बळावले
उकाडा वाढला, आजार बळावले
ऋतू परिवर्तनाला सुरुवात; पारा ३७ अंश पार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला असून, पारा ३७ अंशाच्या पुढे सरकत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि सायंकाळपासून पहाटेपर्यंत बोचणारा उकाडा असा अनुभव ठाणेकरांना येत आहे. साधारण होळी पेटल्यानंतर ऋतू परिवर्तनाला सुरुवात होते. मात्र हे चक्र आधीच फिरल्यामुळे त्याचा फटका आरोग्यावर होऊ लागला आहे. वाढते प्रदूषण आणि चढत्या पाऱ्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार बळावू लागले आहेत.
होळी पेटताच गुलाबी थंडीचे रूपांतर घाम गाळणाऱ्या उन्हाळ्यात सुरू होते. पण गेल्या काही वर्षांपासून ऋतुमान बदलले असून, यंदाही फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा वाढू लागला आहे. सर्वत्र सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे त्यात भर पडत आहे. दरम्यान, हवामान बदलामुळे तापमान मंगळवारपर्यंत तापलेले असेल तर येत्या आठवड्यात दोन दिवस काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेलेल्या माहितीनुसार ऋतू परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे फेब्रुवारीच्या अखेरीस तापमान वाढायला सुरुवात होते. होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होऊन तापमान ४० पार जाण्याची शक्यता आहे.
मार्चनंतर घामाच्या धारा
उत्तरेकडून येणारी हवा मंद होऊन पूर्वेकडून जमिनीवरून हवा वाहणार आहे. त्यामुळे उकाडा वाढला तरी घामाच्या धारा आर्द्रता नसल्याने येणार नाही. पण मार्चनंतर तापमान वाढ होऊन घामाच्या धाराही वाढतील, असे हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलांचा परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. अंगदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखणे, ताप या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून, खासगी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून नागरिकांना दिला जात आहे. तसेच घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी तसेच तोंडावर स्कार्फ किंवा मुखपट्टी लावावाी. शक्यतो दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे.
जिल्ह्याचे तापमान (२१ फेब्रुवारी)
ठाणे - ३७.१
बदलापूर - ३७.२
मुंब्रा - ३७.७
कल्याण-डोंबिविली - ३८
ठाण्याचे तापमान
ठाणे पालिका क्षेत्रातील तापमान फेब्रुवारीपासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या पंधरावाड्यात किमान तापमान २६ ते कमाल तापमान ३५ पर्यंत नोंदवण्यात आले होते. पण १४ फेब्रुवारीनंतर तापमान कमी-अधिक प्रमाणात बदलत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला या महिन्यातील सर्वात कमी ३० अंश तापमान नोंदविण्यात आले. पण त्याच्या चारच दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली असल्याचे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नोंदवले आहे.
२० फेब्रुवारी - ३५.६
२१ फेबुुवारी - ३७,१
२२ फेब्रुवारी - ३७.९

