पडघा मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी
पडघा, ता. २२ (बातमीदार) : जिल्हा परिषद अखत्यारित असलेला आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते विहान होंडा शोरूमपर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यातच रस्त्यालगत बेकायदा पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पडघा गावातील या मुख्य रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.
या रस्त्यालगत अनेक दुकानदार व हातगाडीधारकांनी व्यवसाय थाटला आहे. ग्राहक दुकानांसमोरच चारचाकी व दुचाकी उभी करून खरेदी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वाहनधारक तर बिनधास्तपणे रस्त्यावरच वाहने उभी करून निघून जातात. परिणामी, दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. बेशिस्त वाहनचालक व त्यांना साथ देणाऱ्या काही व्यावसायिकांवर कारवाई कोण करणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
बस स्थानक परिसरातही बेकायदा पार्किंगमुळे बस वळविण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही बसचालक पडघ्यात बस आणण्यास अनुत्साही असल्याचे चित्र आहे. पडघा प्रवेशद्वार ते डॉ. भांगरे दवाखाना, बोरीवली रस्ता, पडघा ग्रामपंचायत ते वाफाळे रोड, पडघा-भादाणे मार्ग, भादाणे जुना रस्ता तसेच बालाजी नगर रस्ता या ठिकाणीही अवैध पार्किंगमुळे वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.
उपाययोजनांची मागणी
रस्ते अरुंद असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर बेकायदा पार्किंगमुळे नेहमीच कोंडीत अडकून राहावे लागते. संबंधित विभागाने तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी कारवाई करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रिक्षाचालक अशोक पाटील यांनी केली आहे.
पडघा : येथे मुख्य रस्त्यावर बेकायदा पार्किंग केली जात आहे.

