कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गपूजन उत्साहात संपन्न
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गपूजन उत्साहात
कल्याण, ता. २२ ः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दुर्गपूजन मोहिमेचे औचित्य साधून, कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर रविवारी (ता. २२) दुर्गपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पुढाकाराने ही परंपरा कायम राखण्यात आली.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १४० गडकिल्ल्यांचे पूजन केले जाते. याच धर्तीवर कल्याणमध्येही दुर्गाडी किल्ल्यावर दूर्गपूजन आयोजित करण्यात येते. जनता सहकारी बँक अधिकारी संघटना, गिरीभ्रमंती मित्र मंडळ, पारनाका मित्र मंडळ, श्री विश्वकर्मा लोहार सुतार समाज मंडळ कल्याण, अन्य संघटना व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा पूजन आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीस दुर्गाडी किल्ल्याची साफसफाई करण्यात आली व त्यानंतर श्री गणेश व दुर्गाडी देवीचे पूजन करून संदीप पळणीटकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर दुर्ग पूजनाचा कार्यक्रम दोन्ही बुरुजाना हार घालून पूजा झाली. प्रशांत रावदेव व सुखदा रावदेव यांनी इतिहास संकलन समितीच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी मिलिंद रेडे, कुमार मिस्त्री, रवींद्र मोरे आणि संदीप पळणीटकर, विनायक भाव, संदीप लिमये, दिनेश निमगडे, कौस्तुभ सुतार उपस्थित होते.

