उन्हाळ्यात शीतपेयांसह लिंबाला मोठी मागणी

उन्हाळ्यात शीतपेयांसह लिंबाला मोठी मागणी

Published on

तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा कल शीतपेयांसह लिंबूपाण्याकडे वाढला आहे. परिणामी बाजारात लिंबाला मोठी मागणी निर्माण झाली आहे. बाजारात लिंबूविक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या मागणीमुळे येत्या काही दिवसांत लिंबाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

फेब्रुवारीच्या मध्यावधीतच तापमानात वाढ झाल्याने थंडपेये, सरबत, ज्यूस सेंटर, तसेच रस्त्यावरील लिंबूपाणी विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत लिंबूपाणी, सोडा-लिंबू, शिकंजी यांना मोठी मागणी असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात लिंबाची खरेदी केली जात आहे. घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील काही आठवड्यांपूर्वी तुलनेने कमी असलेली मागणी आता अचानक वाढली आहे. सध्या घाऊक बाजारात लिंबाचे भाव प्रति किलो १४० ते १८० रुपयांच्या दरम्यान असून, किरकोळ बाजारात प्रतिनग चार ते सहा रुपये भावाने विक्री होत आहे. आवक मर्यादित आणि मागणी वाढती असल्याने भाव स्थिर राहणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हॉटेल, ज्यूस सेंटर आणि केटरिंग व्यवसायिकांकडूनही मोठ्या प्रमाणात लिंबाची खरेदी होत आहे. रमजान आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांच्या मते, उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखी नैसर्गिक पेये आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने नागरिक कृत्रिम शीतपेयांपेक्षा पारंपरिक पेयांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

व्यापाऱ्यांचा अंदाज
एप्रिल, मेमध्ये उष्णतेची तीव्रता वाढल्यास लिंबाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असून, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्रस नवीन आवक वाढल्यास भाव काही प्रमाणात स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com