थकबाकीदारांवर लवकरच कारवाईला वेग येणार

थकबाकीदारांवर लवकरच कारवाईला वेग येणार

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः अनधिकृत बांधकामांवरील २०० टक्के दंड थेट पाच टक्क्यांवर आणल्यानंतर मालमत्ता कर विभागाने कारवाईला वेग दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत सुमारे एक लाख मालमत्ताधारक कर भरत नसल्याची माहिती दिली. तसेच राज्यात सर्वात कमी मालमत्ता कर असतानाही नवी मुंबईचे नागरिक कर भरत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच येत्या काळात कर थकवणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा दिला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेनंतर मालमत्ता कर विभाग आक्रमक झाला आहे. येत्या आठवड्याभरात वाणिज्य व व्यवसायिक स्वरूपाच्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

नवी मुंबई महापालिकेत एकूण तीन लाख ५८ हजार मालमत्ता आहेत. दरवर्षी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर गोळा करण्याचे विक्रमी आकडे गाठले आहेत. या वर्षी महापालिकेने एक हजार २०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, या वर्षाच्या केवळ पहिल्या सात महिन्यांतच (एप्रिल ते ऑक्टोबर) पालिकेने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ३१३ कोटींहून अधिक वाटा डिजिटल पेमेंटचा आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये महापालिकेने अंदाजे ५५८ कोटींची मालमत्ता करवसुली केली होती. पुढील दोन वर्षांत तो थोडा बदल झाला; पण २०२२-२३ मध्ये ६३३.१७ कोटींची विक्रमी वसुली झाली होती, ही त्या वेळेच्या इतिहासातील उच्चतम विक्रम मानली गेली होती. त्यानंतर २०२३-२४ मध्ये महापालिकेने पूर्वीच्या पेक्षा वाढ करून जवळपास ६६६ कोटींपैकी ४६५.७ कोटी पहिल्या नऊ महिन्यांतील वसुलीचा समावेश आहे.

२०२४-२५ मध्ये पहिल्यांदाच ८०० कोटींचा विक्रम मोडला गेला. महापालिकेच्या एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल एक लाख ७० हजार नागरिक मालमत्ता कर भरत नसल्याची आकडेवारी शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत दिली. शहरातील एक लाख ९० हजार लोक मालमत्ता कर भरत आहेत. त्यामुळे एवढा कमी कर असतानाही मालमत्ता कर न भरण्याचे प्रमाण जास्त असल्याने कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत दिले. शिंदे यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांवर कारवाईचे नियोजन केले आहे. येत्या आठवड्यात मालमत्ता कर थकवणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाई तीव्र होणार
गेल्या दोन आठवड्यात महापालिकेने केलेल्या थकबाकीच्या कारवाईत औद्योगिक परिसरातील ५५ जणांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. येत्या आठवड्यात वाणिज्य आणि व्यवसायिक क्षेत्रातील थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निवासी इमारतींवर कारवाई होणार आहे.

जप्तीच्या रीलला दीड लाख व्ह्यूज
नवी मुंबई महापालिकेने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील पेजवर जप्तीच्या कारवाईचा रील तयार केला आहे. हे रील दीड लाख नागरिकांनी पाहिले असून दीड हजार लोकांनी शेअर केले आहे. महापालिकेच्या व्हिडिओला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहण्याची आणि शेअर करण्याची ही पहिलीच घटना आहे.

व्हॉट्सॲपवर ३५ लाखांची वसुली
थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेतर्फे मोबाईलवर मेसेज पाठवले जात आहेत. तसेच महापालिकेच्या चॅटबॉटद्वारे व्हॉट्सॲपवरदेखील मेसेज पाठवले जात असून त्यात कर भरण्यासाठी लिंक पाठवली जात आहे. या मेसेजला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून ३५ लाखांचा कर गोळा झाला आहे.

मालमत्ता थकवणाऱ्यांवर कठोर कारवाईला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्यांना नोटीसमध्ये दिलेली मुदत संपलेली आहे, अशांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
- डॉ. अमोल पालवे, उपायुक्त, मालमत्ता विभाग, नवी मुंबई महापालिका

मालमत्ता कर गोळा - ६४७ कोटी
थकबाकीदारांना नोटीस वाटप - १,५००
सात दिवसांच्या मुदतीच्या नोटीस - १,२००
थकबाकीदारांना ४८ तासांची मुदत - ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com