रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी
रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : देशातील पहिले रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आले असून, या क्लिनिकच्या माध्यमातून राज्यातील महिलांना अखंडित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. तसेच महिलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली रजोनिवृत्ती क्लिनिकबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य विभागाने १४ जानेवारी २०२६ला राज्यात रजोनिवृत्ती क्लिनिक उपक्रमाची सुरुवात केली. अल्पावधीतच या उपक्रमाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असून, दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या राज्यातील ५८० ठिकाणी ही क्लिनिक कार्यरत असून सुमारे ३१,२८८ महिलांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. त्यापैकी ३०,०३४ महिलांना उपचार देण्यात आले असून ८२ प्रकरणे पुढील तपासणीसाठी शिफारस समितीकडे पाठवण्यात आली आहे.
क्लिनिकची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ, औषधसाठा, स्वतंत्र कक्ष, तसेच गोपनीयता व सुविधा उपलब्धतेचे मूल्यांकन करण्याचे निर्देश देण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर, राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत इम्पॅनल डॉक्टर आणि सेवाभावी तज्ज्ञांची मदत घेऊन क्लिनिकची संख्या वाढवण्यावर भर देण्याचेही निर्देश देण्यात आले.
रुग्णांच्या नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी लाइन लिस्ट व सक्षम रेकॉर्ड व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचेही सांगण्यात आले, जेणेकरून भविष्यात आवश्यक मदत व उपचार अधिक सुलभ होतील. तसेच या उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती आणि स्थानिक पातळीवर प्रभावी प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

