भूस्खलनाचा इशारा तीव्र
भूस्खलनाचा इशारा तीव्र
धोकादायक बांधकामांवर कारवाईसाठी बेलापूरमध्ये तिसरी मानव साखळी
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : बेलापूर टेकड्यांवरील वाढत्या भूस्खलनाच्या धोक्याबाबत प्रशासनाला सतर्क करण्यासाठी सुमारे २०० नागरिक व पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी बेलापूरच्या मुख्य चौकात तिसरी मानव साखळी उभी करत तीव्र आंदोलन केले. संवेदनशील उतारांवर उभारलेल्या सुमारे ३० अनधिकृत बांधकामांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा यावेळी देण्यात आला. ‘सेव्ह बेलापूर हिल्स फोरम’ व ‘नॅटकनेक्ट फाउंडेशन’च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार तब्बल २.३ लाख चौरस फूट सार्वजनिक जागेवरील बांधकामे, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड व जमीन सपाटीकरणामुळे टेकडीची माती सैल झाल्याचा आरोप करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दिलेल्या पाडकामाच्या आदेशांनंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांनी पावसाळ्यात माती घसरणे, दगड कोसळणे व रिटेनिंग वॉल ढासळण्याच्या घटना नोंदवल्या असून सुमारे ६०० घरे धोक्याच्या छायेत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. इर्शाळवाडी दुर्घटनेचा दाखला देत वेळेत उपाययोजना न केल्यास बेलापूरमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला. दशकभरापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन नो-डेव्हलपमेंट नियम कठोरपणे लागू करावेत, धोकादायक बांधकामांचे स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली. विविध पर्यावरणवादी संस्था व स्थानिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
चौकट
आपत्तीपूर्व प्रतिबंधात्मक उपायांची गरज
मान्सून जवळ येत असताना बेलापूर टेकड्यांवरील सैल झालेली माती, अनियंत्रित बांधकामे आणि वृक्षतोड यामुळे भूस्खलनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. पायथ्याशी असलेली घरे, धार्मिक स्थळांना येणारे भाविक आणि स्थानिक नागरिक यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे केवळ पाडकामाची घोषणा न करता धोकादायक संरचनांचे पुनर्वसन, पाणी-वीजपुरवठा खंडित करणे, उतारांचे तांत्रिक स्थिरीकरण, वृक्षलागवड आणि सतत भूवैज्ञानिक पाहणी अशा सर्वसमावेशक उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक असल्याची भूमिका पर्यावरणप्रेमींनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

