महाराष्ट्र पर्यटनतर्फे गंजाड येथे मातीचे संमेलन
माती संमेलनात वारली चित्रकला, तारपा नृत्याचा जागर!
गंजाड येथे पर्यटकांसह विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; आदिवासी कलादालन उभारण्याची मागणी
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. २३ : महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने पालघर येथील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पालघर इन्टॅजिबल कल्चरल हेरीटेझ् फेस्टिव्हल अंतर्गत गंजाड येथे ‘मातीच्या रंगांचे संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या जन्मगावी आयोजित या सोहळ्याला नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांनी उदंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री सन्मानित आदिवासी नेते व प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक धिंडा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पालघर जिल्हा परिषद सीईओ मनोज रानडे, खादी ग्रामोद्योगच्या सीईओ दिव्या भास्कर व गीतांजली बावसकर, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आणि एमटीडीसीचे उमेश राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग. तलासरी येथील गोदावरी कॉलेजच्या ४२ विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, दिवंगत जिव्या सोमा म्हसे यांच्या नातवांकडून विद्यार्थ्यांना पारंपरिक वारली चित्रकलेचे शास्त्रशुद्ध धडे गिरवण्याची संधी मिळाली. एमटीडीसीच्या अभिप्सा घोष यांनी या उपक्रमाचे नेटके नियोजन केले होते.
ज्यांनी वारली कला जगभरात पोहोचवली, त्या गंजाड गावात कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या नावाने मोठे ''कलादालन'' उभारले जावे, अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहोत," असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार सदाशिव म्हसे यांनी केले. या तीनदिवसीय संमेलनात सदाशिव म्हसे, बाळू म्हसे, राजेश वांगड, अनिल वांगड, गोरखना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली. पालघरच्या दुर्गम भागातील कला आणि संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हे संमेलन यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
संमेलनाची वैशिष्ट्ये
पारंपरिक वस्तू, हस्तकला आणि स्थानिक वारली कलाकारांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन.
भिकल्या धिंडा यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या तारपा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
स्थानिक आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल पर्यटकांसाठी आकर्षण ठरले.
प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी लिहिलेल्या आदिवासी साहित्याच्या पुस्तकांचा विशेष स्टॉलही या वेळी लावण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

