एकता दौडच्या माध्यमातून महापौरांनी मांडला विकासाचा रोडमॅप
सुदृढ आरोग्यासाठी विरारममध्ये एकता दौडचा जल्लोष
स्पर्धेच्या माध्यमातून महापौरांनी मांडला विकासाचा रोडमॅप
विरार, ता. २३ (बातमीदार) : सध्याच्या डिजिटल युगात मुले मैदानी खेळांपासून दुरावत चालली आहेत. त्यांच्यात खेळाची आवड निर्माण व्हावी आणि भावी पिढी सुदृढ व्हावी, या उद्देशाने दरवर्षी महापौर ट्रॉफी ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात येते, अशी भावना वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी व्यक्त केली. रविवारी (ता. २२) विवा गिरीविहार चौक येथे एकता दौडचे आयोजन पार पडले, तेव्हा महापौरांसह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
विवा गिरीविहार उत्सव समिती व बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे यंदा २४ वे वर्ष होते. रविवारी सकाळी ६.३० वाजता महापौरांच्या हस्ते या दौडचा शुभारंभ झाला. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेत तीन हजारांहून अधिक लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान शहराच्या क्रीडा विकासाबाबत बोलताना महापौरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. विरारमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळाव्यात, यासाठी आरक्षित जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी असलेल्या क्रिकेट मैदानाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले. विरार पश्चिम येथील क्रीडा संकुल लवकरच सेवेत येईल, तर फुलपाडा येथील महापालिका तरणतलावाचे अत्याधुनिकरण केले जाणार असल्याची माहिती महापौरांनी या वेळी दिली.
शहरातील दौडचे मार्ग कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. क्रीडा संस्कृतीसोबतच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेने कंबर कसली आहे. दमणच्या धर्तीवर अर्नाळा आणि वसई किनारा तसेच मैदानांचा विकास करून क्रीडा पर्यटन वाढवण्याचा मानस महापौरांनी बोलून दाखवला. तसेच, तरुणांना खेळासोबतच रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, महापालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वांना मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली.
या सोहळ्याला नगरसेवक प्रशांत राऊत, निशाद चोरघे, नगरसेविका संगीता भेरे, मिनू झा, प्रतिभा पाटील, माजी नगरसेवक बी. बी. गमरे, ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र पाटील, माजी सभापती चिरायू चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील, हार्दिक राऊत आणि विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास तुरे, पोलिस उपनिरीक्षक कदम यांच्यासह अनेक मान्यवर व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नगरसेवक प्रशांत राऊत यांनी या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. रेडिएंट हॉस्पिटल, वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय विभाग, रुग्णवाहिका सेवा, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य विभाग, विरार पोलिस ठाणे, वाहतूक शाखा आणि इशिता ड्रीम फाउंडेशन यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

