शाहू नगरवासीयांचा पुनर्विकासातील स्थलांतरास ठाम विरोध

शाहू नगरवासीयांचा पुनर्विकासातील स्थलांतरास ठाम विरोध

Published on

शाहू नगरवासीयांचा पुनर्विकासातील स्थलांतरास ठाम विरोध
“हक्काचे घर मिळाल्याशिवाय इंचभरही हलणार नाही,” रहिवाशांचा निर्धार
धारावी, ता. २३ (बातमीदार) : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर माहीम पूर्व येथील शाहू नगर वसाहतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलविण्याच्या हालचालींना स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. “हक्काचे घर मिळाल्याशिवाय इंचभरही हलणार नाही,” असा ठाम निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला.
शाहू नगर विकास समिती व डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती समितीच्या वतीने शाहू नगर येथे शनिवारी (ता. २१) सायंकाळी तातडीची बैठक घेण्यात आली. १३ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत शाहू नगर येथील रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरावर चर्चा झाली होती. मात्र, संक्रमण शिबिरात जाण्यास रहिवाश्यांनी स्पष्ट नकार दिला. या पार्श्वभूमीवर घडामोडींची माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.
या वेळी नगरसेविका हर्षलाताई मोरे म्हणाल्या, “धारावी पुनर्विकासाचा आराखडा अद्याप जाहीर झालेला नाही. रहिवाशांना नेमकी घरे कुठे देणार, याची स्पष्टता नाही. अशा परिस्थितीत लोकांना संक्रमण शिबिरात हलविणे अन्यायकारक आहे. जोपर्यंत प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळत नाही, तोपर्यंत कोणालाही येथून हलू देणार नाही.”
नगरसेवक जोसेफ कोळी यांनीही संताप व्यक्त करत सांगितले, “धारावीतील सर्वांत सुस्थित वसाहत म्हणजे शाहू नगर आहे. येथील रहिवासी गुण्यागोविंदाने राहतात. त्यांना का हलवायचे? पुनर्विकास प्रक्रियेमुळे कोळी समाजातील नागरिकांना आधीच मोठा त्रास सहन करावा लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील रहिवाशांना हलवू देणार नाही.”
दरम्यान, शाहू नगर परिसरात अस्वस्थतेचे वातावरण असून, रहिवासी आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. “हक्कासाठी लढू, पण घर सोडणार नाही,” असा एकमुखी आवाज बैठकीत उमटला.
या बैठकीस माजी आमदार बाबुराव माने, काँग्रेसचे दीपक खंदारे, डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती समितीचे निमंत्रक आशीष मोरे, विवेक कांबळे, राजेश शर्मा, तसेच धारावी बचावचे नसरूल हक्क, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे धारावी तालुका अध्यक्ष उलेश गजाकोश, शाखाप्रमुख मुत्तू पट्टन तसेच शाहू नगरमधील मकरंद काणे, संजय मानकर, शेखर तोडणकर, विशाल जामदार, व्हिक्टर सालढाणा, दीपक वाघमारे, हरीश लेखक, गजानन पेडणेकर, भूषण नागवेकर, जयेश सैद, सेलिस्टीन रॉड्रिग्स, कुंदन शेजवळ आदी रहिवासी उपस्थित होते.

इथेच पुनर्वसन करा!
शाहू नगर भाडेकरू संघाचे माजी अध्यक्ष अरुण जाधव म्हणाले, “आम्ही पूर्वीच स्थलांतरित आहोत. पुन्हा संक्रमण शिबिरात पाठविणे हा अन्याय आहे. आमचे पुनर्वसन शाहू नगरातच झाले पाहिजे.” या आंदोलनात सर्व रहिवाशांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com