वाहतूक नियमांचा जागर
वाहतूक नियमांचा जागर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, ता. २२ : नागरिकांना मोफत कायदेशीर सहाय्य, तक्रार निवारण आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देतानाच वाहतूक नियमांचे महत्त्व प्रभावी पद्धतीने पटवून देणारे महाशिबिर रविवारी (ता. २३) ठाण्यात उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कायदे साक्षरतेसोबत वाहतूक जनजागृतीचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम ठरला.
या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाशिबिरात नागरिकांना मोफत विधी सेवा, कायदेशीर सहाय्य व तक्रार निवारणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत अनेकांना त्यांचा प्रत्यक्ष लाभही देण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर बजावल्या जाणाऱ्या ई-चलान प्रणालीची कार्यपद्धती प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे समजावून सांगितले. तसेच, राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून तब्बल १४ कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती देत पर्यायी वाद निवारण पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
वाहतूक विभागाचा विशेष कक्ष ठरला आकर्षण
ठाणे शहर वाहतूक विभागाने उभारलेला विशेष कक्ष व प्रदर्शन मार्गिका हे विशेष आकर्षण ठरले. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे व सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण केली. काँक्रीट रस्त्यासारखे कार्पेट अंथरून त्यावर पादचाऱ्यांना चालता-चालता वाहतूक नियमांचे आकलन होईल, अशी अभिनव संकल्पना राबविली. विविध ट्रॅफिक साईनचे फलक लावून प्रत्यक्ष उदाहरणांसह नियम समजावून सांगितले. तसेच, ई-चलान प्रणालीचा डेमो, आयटीएमएस कॅमेऱ्यांची कार्यपद्धती आणि वाहतूक विभागाचे कामकाज याबाबत माहिती दिली. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देताना बजावलेल्या कामगिरीची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
ट्रॅफिक सेन्स जागवण्याचा प्रयत्न
या महाशिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स जागवणे, नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण करणे आणि कायदे साक्षरतेचा व्यापक संदेश देणे हा उद्देश साध्य केला. कायदेविषयक साक्षरता आणि वाहतूक जनजागृती यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम समाजहिताचा प्रभावी संदेश देणारा ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

