टिटवाळ्यात महागणपती तलावावर ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’
महागणपती तलावावर ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’चा संकल्प
टिटवाळ्यात संत निरंकारी मिशनच्या अभियानाने जलसंवर्धनाला नवा वेग
टिटवाळा, ता. २३ (वार्ताहर) : संत निरंकारी मिशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत टिटवाळ्यातील महागणपती तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या घोषवाक्यासह शेकडो स्वयंसेवकांनी श्रमदान करून जलसंवर्धनाचा नवा आदर्श घालून दिला. देशव्यापी असलेल्या या अभियानाचा चौथा टप्पा टिटवाळा नगरीत उत्साहात पार पडला. या उपक्रमाने परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण-जागराची नवी चेतना निर्माण केली.
संत निरंकारी मिशनमार्फत ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत साकारलेल्या या उपक्रमाला देशव्यापी स्वरूप लाभले असून, ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या घोषवाक्याखाली भारतातील सुमारे १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानुसार टिटवाळ्यातील महागणपती तलाव परिसरात सकाळपासून स्वयंसेवकांनी कचरा, प्लॅस्टिक व गाळ हटवून परिसर स्वच्छ, सुशोभित आणि सुरक्षित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्थानिक नागरिकांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला. महागणपती मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
१७ हून अधिक ठिकाणी व्यापक मोहीम
डोंबिवली परीक्षेत्रात क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली मोठागाव खाडी गणेश घाट, गोग्रासवाडी गणपती तलाव, भिवंडी ब्राम्हणअळी खेणी गाव, व्हराळदेवी तलाव, कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलाव, कल्याण पूर्वेतील आडीवली तलाव, सोनारपाडा माउली तलाव, ठाकुर्ली गणेश घाट नवापाडा, शहापूर गंगा देवस्थान, अंबरनाथ-उल्हासनगर खदान तलाव, भिसोळ पाचवा मैल नदी, बदलापूर कान्होर गाव तलाव, वासिंद गणेश घाट भातसई रोड, कसारा तलाव, सावर्णे काळू नदी आदी मिळून तब्बल १७ हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम उभारण्यात आली.
स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव
विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट देत मानवतावादी कार्याचे कौतुक केले. कल्याण येथे महापौर ॲड. हर्षाली चौधरी, डोंबिवली येथे नगरसेवक दिपेश म्हात्रे, बदलापूर येथे सरपंच दर्शना देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि आध्यात्मिक मूल्यांची जोड यामुळे या अभियानाला व्यापक लोकसमर्थन लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

