मानपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारा
मानपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारा
सकल मराठा समाजाची आयुक्तांसह महापौर, उपमहापौर यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिकेच्या घोडबंदर रोडवरील प्रभाग क्र. ४ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, ठाणे आणि समस्त मराठा व इतर समाजघटकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी ठाणे पालिका आयुक्तांसह महापौर आणि उपमहापौर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचा आदर्श भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या ठिकाणी स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. स्मारकामुळे परिसरात ऐतिहासिक व सांस्कृतिक जाणीव अधिक बळकट होईल, असा विश्वास मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, ठाणे आणि समस्त मराठा व इतर समाजघटकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, स्मारक उभारणीसाठी संबंधित जागेचे सर्वेक्षण करून आवश्यक निधीची तरतूद करावी. प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेच्या अजेंड्यावर समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या विषयाची सकारात्मक दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, ठाणे तसेच समस्त मराठा व इतर समाजघटकांच्या वतीने रमेश अंब्रे यांनी ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्याकडे व्यक्त केली.

