ठाण्यात तरुणाचे अपहरण; ५ लाखांच्या खंडणीची केली मागणी

ठाण्यात तरुणाचे अपहरण; ५ लाखांच्या खंडणीची केली मागणी

Published on

ठाण्यात तरुणाचे अपहरण
५ लाखांच्या खंडणीची केली मागणी ः दोघांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : घोडबंदर रोड परिसरात दोन व्यक्तींनी एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझादनगर येथील तक्रारदार (२०) व त्याचा मित्र अनिकेत हे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाघबीळ येथून दुचाकीवरून घरी परतत होते. सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता मानपाडा उड्डाणपूल पार करून शिवाजी चौक, मनोरमानगरकडे वळत असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यावेळी मागे बसलेल्या व्यक्तीने अनिकेतची कॉलर पकडून मारहाण केली व धमकी देत जबरदस्तीने त्याला त्यांच्या मोटारसायकलवर बसवून ठाण्याच्या दिशेने पळ काढला. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीची चावीही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर रात्री सुमारे ९.३० वाजता अनिकेतच्या मोबाईलवरून व्हॉट्सॲप कॉल आला असून ५ लाख रुपये जमवा, अशी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी त्या अनोळखी दोन आरोपींविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com