‘वन’ संज्ञेविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र
मुरबाड, ता. २३ (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारकडून लावण्यात आलेली ‘वन’ संज्ञा कमी करण्यात यावी, या मागणीसाठी मुरबाड तालुक्यातील शेतकरी एकवटले आहेत. गोदरेज ॲण्ड बॉइसी आणि ओबेरॉय रिॲलिटी यांसारख्या काही पक्षकारांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०२५ ला संबंधित पक्षकारांच्या बाबतीत ‘वन’ नोंद रद्द करण्याचा निर्णय दिला. मात्र, हा निर्णय केवळ न्यायालयात गेलेल्या पक्षकारांपुरताच मर्यादित राहिल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हा निर्णय सर्व बाधित शेतकऱ्यांना लागू करून त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील ‘वन’ संज्ञा कमी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सह्याद्री परिसर शेतकरी संस्था या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुरबाड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी, कल्याण यांच्याकडे सविस्तर अर्ज सादर करण्यात येणार आहेत. हे अर्ज कशा प्रकारे भरावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (ता. २८) मुरबाड येथे शेतकऱ्यांची सभा होणार आहे. मुरबाड शहरातील म्हसा रोड भागातील कुणबी समाज हॉल येथे दुपारी ३ वाजता ही सभा होणार आहे. सेक्शन ३५ बाधित शेतकऱ्यांची सभेच्या नियोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक देसले, शंकर कोर, सुहास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना एकत्र केले जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीला उपस्थित राहून अर्ज भरावेत आणि कल्याण प्रांत अधिकारी यांना सादर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शेतकरी हैराण
खासगी जमिनीवर ‘वन’ संज्ञा लागल्यामुळे ठाणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. या नोंदीमुळे जमिनीवर वनेतर कामे करण्यावर निर्बंध आले आहे. वनविभागाकडून विविध मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी, स्वतःच्या मालकीची जमीन असूनही शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, झाडे तोडता येत नाहीत किंवा इतर विकासकामे करता येत नाहीत. या निर्णयाविरोधात काही शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागितला असता त्यांना दिलासा मिळाला. मात्र, सर्व बाधित शेतकऱ्यांना तो निर्णय लागू न झाल्याने प्रश्न कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

