डहाणूत मिरची उत्पादनाला उभारी

डहाणूत मिरची उत्पादनाला उभारी

Published on

डहाणूत मिरचीला सुगीचे दिवस
नगदी पिकातून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई; तरुणांचा कल वाढला, दर पोहोचला शंभरीपार
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. २३ : पारंपरिक शेतीला फाटा देत डहाणू तालुक्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळले असून, यात हिरव्या मिरचीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर मिरची उत्पादनाकडे आकर्षित होत असून, बदलत्या हवामानातही योग्य नियोजनाच्या जोरावर डहाणूची मिरची आता थेट नवी मुंबई आणि वापीच्या बाजारपेठांत झळकू लागली आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या लागवडीनंतर आता मिरची तोडणीला वेग आला आहे. सुरुवातीला ५० ते ५५ रुपये मिळणारा प्रतिकिलोचा दर आता मागणी वाढल्याने १०० ते १०५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत हा दर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तरुणांची हायटेक शेती
डहाणूतील वाणगाव, खेतखाडी, साखरे, चंद्रनगर, चारोटी आणि सायवन परिसरात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. सारणी येथील नरेश गुहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सात ते आठ एकरांवर मिरची लावली असून, दिवसाला सुमारे १,००० किलो मिरचीची तोड होत आहे.

आव्हाने आणि उपाय
वाढता खर्च आणि काही ठिकाणी पडणारा रोगाचा प्रादुर्भाव यावर मात करण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी आता ठिबक सिंचन आणि शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करून दर्जा टिकवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

आम्ही नाल्याच्या पाण्यावर मिरचीचे यशस्वी पीक घेतले आहे. रोज ८०० ते १,००० किलो उत्पादन निघत असून, चांगल्या दरामुळे व्यापाऱ्यांचे टेम्पो थेट शेतावर येत आहेत. या शेतीमुळे ३० ते ४० स्थानिकांना रोजगार मिळाला असून, रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होत आहे.
- रघुनाथ सुतार, प्रगतशील शेतकरी

उत्पादनाचा लेखाजोखा
तालुक्यात डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळांत मिरचीचा मोठा विस्तार झाला आहे.
एकूण क्षेत्र : १०७१.३५ हेक्टर
तिखट मिरची : ७७२ हेक्टर
ढोबळी मिरची : २९९.०५ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com