बेशिस्त रिक्षाचालकांना दणका

बेशिस्त रिक्षाचालकांना दणका

Published on

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारी (ता. २१) वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून ५४१ रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून ८० हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही चालक हे वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेक प्रवाशांनी बेशिस्त व बेजबाबदारपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तक्रारीदेखील केल्या होत्या. त्या अनुषंगाने वाहतूक विभागाच्या वतीने रिक्षा युनियन, रिक्षा चालक-मालक यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरदेखील काही चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले आहे.

वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक) विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात शनिवारी विशेष मोहीम राबवण्यात आली. या विशेष मोहिमेत भाडे नाकारणारे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे, गणवेश परिधान न करणारे, बॅच न लावणारे, रहदारीस अडथळा आणणारे, परवाना जवळ न बाळगणारे, फ्रंट सिट प्रवासी वाहतूक करणारे, तसेच इतर वाहतूक नियमांचे पालन न करणारे अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५४१ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. यापुढील काळातदेखील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील कारवाई सुरूच रहाणार असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

Marathi News Esakal
www.esakal.com