भूमी अभिलेख कार्यालयात सामूहिक रजा आंदोलन
भूमी अभिलेख कार्यालयात सामूहिक रजा आंदोलन
कामकाज पूर्णपणे ठप्प; मोजणी, नकाशे व दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांची परतफेड
कर्जत, ता. २३ (बातमीदार) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा आंदोलन सुरू केल्याने कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. कर्मचारी कार्यालयाबाहेर असहकार आंदोलन करत उभे राहिल्याने सोमवारी सकाळपासून मोजणी, नकाशे, उतारे व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागले. त्यामुळे शेतकरी, बांधकाम व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावर ‘भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १८ व २० फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीची कामे बंद ठेवण्यात आली होती. काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर आता सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनावर टीकाही केली. स्थानिक शेतकऱ्यांची कामे प्रलंबित ठेवली जातात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चौकट
तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न
२०१२ पासून भूमी अभिलेख विभागातील पदांसाठी तांत्रिक शैक्षणिक अर्हता लागू करण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप कारकून संवर्गाप्रमाणेच वेतन मिळत असल्याची तक्रार आहे. या संदर्भातील समितीचा अहवाल शासनाकडे सादर होऊनही निर्णय न झाल्याने राज्यभर असंतोष वाढला असून, आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. शासनाने तातडीने चर्चेचा मार्ग स्वीकारून तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

