बेलापूरमध्ये ‘भारूड – ए – बिबट’तून जनजागृती
बेलापूरमध्ये ‘भारूड-ए-बिबट’तून जनजागृती
मानव-वन्यजीव सहजीवनाचा संदेश; तलाव पुनर्जीवनाची पुनर्वसु फाउंडेशनची मागणी
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : सीबीडी बेलापूर परिसरात बिबट्याबाबत असलेले गैरसमज व भीती दूर करण्यासाठी पुनर्वसु फाउंडेशन आणि वन्यवाणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. ॲग्रो गार्डनच्या जुई यांच्या पुढाकाराने आयोजित ‘वसंतउत्सव’ कार्यक्रमात “भारूड-ए-बिबट” या प्रभावी कलाविष्कारातून नागरिकांना मानव-वन्यजीव सहजीवनाचा संदेश देण्यात आला.
मकरंद भास्कर सावंत लिखित व दिग्दर्शित तसेच कुणिका बनसोडे सावंत निर्मित या भारुडाचे सादरीकरण महेश कापरेकर व सागर चव्हाण यांच्या पथकाने केले. या वेळी प्रीतम भुसाणे, उत्कर्षा चव्हाण, उमेश अवधूता, अष्टविनायक मोरे, सृष्टी सोनवणे, शुभम दळवी व स्मिता दळवी यांनी सहभाग घेतला. बिबट्या हा सजीव साखळीचा महत्त्वाचा घटक असून, त्याला मानवाचा शत्रू समजणे चुकीचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. विकासाच्या नावाखाली अधिवासांवर होत असलेल्या अतिक्रमणामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी मोलाच्या सूचना देण्यात आल्या. बिबट्या दिसल्यास घाबरू नये, ताठ उभे राहावे किंवा उंच जागी जावे, वन परिसरात आवाज करत फिरावे तसेच ट्रेकिंगला गटाने जावे, अशा सूचना देण्यात आल्या.
चौकट
वन्यजीवांसाठी पाणीसाठ्यांचे पुनर्जीवन आवश्यक
उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. ही समस्या टाळण्यासाठी सेक्टर ८ बेलापूर टेकडी पायथ्यावरील जुन्या तलावाचे पुनर्जीवन करावे तसेच सेक्टर ९ परिसरात पावसाचे पाणी अडवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पुनर्वसु फाउंडेशनने सिडको, नवी मुंबई महापालिका व ठाणे वन विभागाकडे केली आहे. वन्यजीवांसाठी स्थानिक स्तरावर पाण्याची उपलब्धता निर्माण केल्यास मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

