बदलापूर पूर्व स्थानकाबाहेर संयुक्त भारत पक्षाचे आमरण उपोषण!
बदलापुरात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन
स्थानकाबाहेर संयुक्त भारत पक्षाचे आमरण उपोषण
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) ः संयुक्त भारत पक्षाच्या वतीने बदलापूर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण आजपासून पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत रेल्वे फेऱ्या अपुऱ्या असल्याने येथे वारंवार किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बदलापूर पूर्व रेल्वे स्थानक येथे अपुऱ्या रेल्वे फेऱ्या, वाढणारे रेल्वे अपघात, स्थानक अद्ययावतीकरणाचा संथ कारभार, तांत्रिक अडचणी आणि प्रवाशांसाठी असलेल्या अपुऱ्या सुविधांबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व मुद्द्यांसह एकूण १८ प्रमुख मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदन मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात देण्यात आले असून, रेल्वे प्रशासनाने उपोषणास परवानगी नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपोषण हा आमचा संविधानिक अधिकार असून, तोच अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर आम्ही काय करायचे, असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ पाच मागण्यांवरच चर्चा
स्थानकाबाहेरील दत्त मंदिराशेजारील जागेत पक्षाचे पदाधिकारी उभे राहून उपोषण करत आहेत. त्या ठिकाणी रेल्वे पोलिस दलाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून बैठकीचे नियोजन मिळाले असले तरी, केवळ पाच मागण्यांवरच चर्चा होऊ शकते, अशी अट घालण्यात आल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रमुख मागण्या
-नुकत्याच झालेल्या अपघातात चेतना यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, कुटुंबास योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच कुटुंबातील एका सदस्यास रेल्वेसेवेत सामावून घेण्यात यावे.
-बदलापूर रेल्वे स्थानकावरील सर्व प्रलंबित व संथ गतीने सुरू असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
-प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अपुऱ्या लोकल फेऱ्यांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी त्वरित अतिरिक्त लोकल गाड्या व १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यात याव्यात.
-स्थानक परिसर, फलाट, जिने, लिफ्ट व बाह्य परिसरात २४ तास कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे व प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.
-स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता व बसण्याच्या सुविधा तातडीने सुधारण्यात याव्यात.
-स्थानक परिसरातील अतिक्रमणे, फेरीवाले व अनधिकृत रिक्षा थांबे हटवून प्रवाशांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावेत.
सकाळपासून आम्ही हे उपोषण सुरू केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात आम्ही हा मार्ग अवलंबला आहे. उपोषणसंदर्भातील निवेदन आठ दिवसांपूर्वीच आम्ही संबंधित कार्यालयाला दिले आहे. मात्र, तरीही उपोषणाची परवानगी मिळाली नाही. संविधानिक मार्गाने आम्ही उपोषण करत असतानादेखील आम्हाला रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळालेले नाही. जोपर्यंत रेल्वे प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आहोत.
-अशोक बहादरे, राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारत पक्ष
१५ कोचसाठीचे काम मध्य रेल्वेद्वारा सुरू करण्यात आले आहे, लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. बदलापूर स्थानकातील काही कामेही एमआरव्हीसीच्या माध्यमातून केली जात आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा काम लवकरात लवकर करण्यासाठी सांगितले जाईल.
- स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

