परिवहन सदस्यांवरून गदारोळ

परिवहन सदस्यांवरून गदारोळ

Published on

वाशी, ता. २३ (बातमीदार) : परिवहन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून नवी मुंबई महापालिकेच्या सोमवारी (ता. २३) झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात गदारोळ झाला. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या वादाचे रूपांतर सभागृहातील गोंधळात झाल्याने अखेर महापौर सुजाता पाटील यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

महापौरांनी परिवहन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करताच विरोधकांनी त्याला विरोध दर्शवत घोषणाबाजी सुरू केली. काही नगरसेवकांनी महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांनी थेट व्यासपीठावर चढून राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नगरसेवकही महापौरांच्या समर्थनार्थ व्यासपीठावर गेले. त्यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब झाले. काही वेळानंतर पुन्हा सभागृह सुरू झाले, तेव्हा परिवहन समितीसाठी भाजपकडून १२, तर शिवसेनेकडून पाच सदस्यांची नावे सुचवण्यात आली होती. मतदान प्रक्रियेद्वारे भाजपचे सर्व इच्छुक निवडून आले.

दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात काही काळ कामकाज ठप्प झाले. महापौरांनी वारंवार शांततेचे आवाहन केले; मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अखेर सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या प्रारंभीच्या बैठकीपासूनच विविध मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत.

परिवहन समितीच्या निवडीचा वादही त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरत असून, महापौरांकडून तहकूब झालेले सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर सभागृह नेते सागर नाईक यांनी परिवहन समिती सदस्यांची निवड करण्याचा प्रस्तव मांडला. त्यानुसार भाजपचे १२ सदस्य निवडून आले. आता विरोधक काय भूमिका काय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न
सभागृहातील गोंधळ वाढत असल्याने महापौरांनी सदस्यांना शांततेचे आवाहन केले; मात्र विरोधकांनी व्यासपीठावर चढून महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहातील परिस्थिती अधिक चिघळली. भाजपच्या महिला नगरसेविकाही महापौरांच्या समर्थनार्थ व्यासपीठावर चढल्या. महापौरांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून अखेर परिस्थिती निवळावी आणि सदस्यांना चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

महापौर आसनासमोर आंदोलन
महापालिका सदस्यांव्यतिरिक्त सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी ‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत महापौरांच्या आसनासमोर जमिनीवर बसून आंदोलन केले.

विरोधकांचे आरोप फेटाळले
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी परिवहन समितीच्या रचनेवर आक्षेप घेत, ही निवड नियमबाह्य असल्याचा आरोप केला. संख्याबळाच्या तुलनेत प्रतिनिधित्व दिले गेले नसल्याचे सांगत त्यांनी निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर सत्ताधारी भाजपने नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्यात आल्याचे सांगत आरोप फेटाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com