प्रदूषणामुळे जिवाला घोर

प्रदूषणामुळे जिवाला घोर

Published on

प्रदूषणामुळे जीवाला घोर
तारापूरमधील हवेची गुणवत्ता ढासळली, आरोग्यावर गंभीर परिणाम
निखिल मेस्त्री / संतोष घरत
पालघर, ता. २४ ः आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेला तारापूरचा परिसर सध्या प्रदूषणाच्या छायेत आहे. तीन महिन्यांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने घसरत असल्याने वाढलेल्या धुरकटपणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
तारापूर परिसरात तीन महिन्यांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ‘मध्यम’वरून ‘खराब’, काही दिवस ‘अतिखराब’ पातळीवर पोहोचला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीसह कोलवडे, कुंभवली, पास्थळ, पांम, सालवड, सरावली गावांमध्ये कंपन्यांचा धूर, रासायनिक प्रक्रियेतील प्रदूषणकारी वायू, बांधकाम, रस्त्यावरून उडणारी धुळीमुळे प्रदूषण फोफावले आहे. तीन महिन्यांत हवेचा निर्देशांक सरासरी १५० इतका आहे. मात्र, त्यानंतरही हव्या तशा उपाययोजना करण्यात औद्योगिक विकास महामंडळ, कंपन्या, ग्रामपंचायत, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्वच यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
------------------------
आरोग्यविषयक तक्रारींत वाढ
- जिल्ह्याच्या जनता दरबारात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न थेट पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासमोरही उपस्थित झाला. पालकमंत्री यांनी याकडे लक्ष घालण्याच्या सूचना केल्या असताना हवा गुणवत्ता निर्देशांक स्थिर राहण्याच्या ठोस उपाययोजना केल्या नसल्याने हवेचा दर्जा खालावला आहे.
- पर्यावरणतज्ञांच्या मते रासायनिक कंपन्यांनी हवेत सोडलेला प्रदूषित धूर, हवेत मिसळणारी धूलिकणांमुळे फुप्फुस, हृदयविकाराचा धोका वाढतो. औद्योगिक क्षेत्र परिसरात प्रदूषण असल्याने दमा, खोकला, त्वचाविकार, घशात जळजळ, डोळ्यांची आग अशा तक्रारी वाढल्या आहेत.
---------------------------------------
तीन महिन्यांपासून धोक्याची घंटा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या खैरा येथील हवा निर्देशांक मोजणी केंद्रावर डिसेंबरपासून आतापर्यंत हवा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतून ‘खराब’ श्रेणीत पोहोचला आहे. डिसेंबर महिन्यात केवळ नऊ दिवस हवा निर्देशांक समाधानकारक होता. बाकीचे दिवस निर्देशांक १०५ ते १४२ अर्थात धोकादायक स्थितीत होता. जानेवारीत ११ दिवस सोडले, तर बाकीच्या दिवसांत हवा निर्देशांक १०७ ते १७९ होता. आता फेब्रुवारीत मंगळवारपर्यंत हवा निर्देशांक मानवी आरोग्यासाठी धोकादायक दर्शवत आहे. फेब्रुवारीमध्ये केवळ तीन दिवस हवेची गुणवत्ता सुधारली होती. बाकीचे सर्व दिवस हवेत प्रदूषण दिसून येत आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता काही दिवसांत निर्देशांक २०० पेक्षा जास्त नोंदवला जाण्याची भीती आहे.
----------------------------------------
हवा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रित राहावा, यासाठी उपाययोजनाबाबत संबंधित यंत्रणांना वारंवार सूचना केल्या आहेत. त्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- राजू वसावे, उपप्रादेशिक अधिकारी, तारापूर, प्रदूषण नियंत्रण मंडळ
-------------------------------
दररोजच्या प्रदूषणामुळे घरातून बाहेर पडताना नाकाला रुमाल लावून निघावे लागते. नागरिक प्रदूषणाने हैराण आहेत. प्रदूषणाच्या उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.
- परशुराम दुमाडा, सदस्य, बोईसर ग्रामपंचायत
----------------------------
- हवा गुणवत्ता निर्देशांक - १०५ ते १७९ (डिसेंबर ते फेब्रुवारी)
- सकाळी ८ ते १२, संध्याकाळी ७ नंतर धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com