तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना काळजी घेण्याचा आवाहन
तापमानात लक्षणीय वाढ
विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
विरार, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सोबतच काही सीबीएससी शाळांमध्ये पहिली ते नववीच्या परीक्षादेखील सुरू आहेत. अशात मागील काही दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांच्या वतीने देण्यात आला आहे.
वसई, विरार शहरातदेखील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. येथील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मागील काही दिवसांत निर्जलीकरण (डिहायड्रेशन), उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या तसेच पोटाचे संसर्ग यासारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. लांबचा प्रवास, गर्दीची सार्वजनिक वाहतूक आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे परीक्षेला बसणाऱ्या किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत आहेत. मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे आंतरिक औषधतज्ज्ञ डॉ. जिनेंद्र जैन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उन्हाच्या झळांच्या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. परीक्षेच्या ताणामुळे अनेक विद्यार्थी जेवण टाळतात, त्यामुळे निर्जलीकरणाचा धोका वाढतो. यामुळे थकवा, एकाग्रतेत घट, चक्कर येणे आणि उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी पुरेसे पाणी प्यावे आणि उपाशीपोटी घराबाहेर पडू नये.
आरोग्यतज्ज्ञांनी शाळा आणि परीक्षा केंद्रांना योग्य वायुवीजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सावलीत प्रतीक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरी आरोग्याशी तडजोड करू नये, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. वेळेवर पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो आणि विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान एकाग्र व सुरक्षित राहण्यास मदत होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉ. जिनेंद्र जैन यांनी दिली. तसेच काही लक्षणे कायम राहिल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
----------
पुरेसे पाणी प्या
डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचे आणि परवानगी असल्यास परीक्षा केंद्रावर पाण्याची बाटली सोबत नेण्याचे आवाहन केले आहे. ओआरएस, नारळपाणी आणि घरगुती लिंबूपाणी यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत होते. प्रवासादरम्यान हलक्या रंगाचे सैल सूती कपडे परिधान करणे तसेच टोपी किंवा छत्रीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

