बळीराजाला उन्हाळी भातशेतीचा आधार
उन्हाळी भातशेतीकडे शेतकऱ्यांचा कल
पाटपाण्याच्या जोरावर लावणी वेगात; खरीप तोट्यानंतर नवी उभारी
वाणगाव, ता. २४ (बातमीदार) : डहाणू तालुका येथे धामणी धरण व कवडास धरण यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाटपाण्यामुळे शेतकरी उन्हाळी भातशेतीकडे वळले आहेत. परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटले असतानाही शेतकऱ्यांनी मनोबल खचू न देता उन्हाळी भातलागवड सुरू केली आहे.
पाटपाण्याची सुविधा असलेल्या भागांत रोपांची पुनर्लागवड वेगाने सुरू असून, अनेक ठिकाणी लावणी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उन्हाळी हंगामात भाताची रोपे १५ ते २० दिवसांत लागवडीस तयार होत असल्याने या आठवड्यात बहुतांश भागातील लावणी पूर्ण होईल, असा विश्वास भात उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील कासा मंडळ व वाणगाव मंडळ कार्यक्षेत्रात मिळून सुमारे ५८८.७ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भातलागवड करण्यात येत आहे. सारणी, घोळ, भराड, रानशेत, वधना, पिंपळशेत, म्हसाड, नानिवली, ऊर्से व सोनाळे आदी गावांत मोठ्या प्रमाणावर शेती केली जात आहे. राशी पूनम, कर्जत-१८४, कर्जत-३, कर्जत-४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री व पालघर-१ या जातींची लागवड करण्यात येत आहे.
उन्हाळी भातपिकाचा उत्पादन कालावधी सुमारे साडेतीन ते चार महिने असून, प्रति एकर १२ ते १५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. पावसाळी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात अधिक सूर्यप्रकाश, कमी आर्द्रता व रोगांचा कमी प्रादुर्भाव यामुळे उत्पादन चांगले मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चौकट
उन्हाळी भातशेती फायदेशीर
पावसाळी हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात सूर्यप्रकाश कमी असतो. उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात प्रखर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे खतास प्रतिसाद जास्त मिळतो. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आद्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही रोगाचे प्रमाण पावसाळी भातपिकापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते. पावसाळी पेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन चांगले येईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
------------
खरिपात निसर्गाच्या बदलामुळे अपेक्षित उत्पन्न साध्य होत नसल्याने ज्या भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेतीबरोबरच भाजीपाला पिकांची लागवड करावी.
- सचिन तोरवे, कृषी अधिकारी, वाणगाव मंडळ
------
पावसाळ्यातील शेतीपेक्षा उन्हाळ्यातील पिकांमध्ये जास्त फायदा होतो. पावसाळ्यामध्ये रोगराई आणि अतिवृष्टी, पूर यांचा सामना करावा लागतो, तर उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. उन्हाळी हंगामात चांगले उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खरीप हंगामापेक्षा उन्हाळी भातलागवड फायदेशीर आहे.
- संजय पाटील, प्रगतिशील शेतकरी, उर्से, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

