फेरबदल प्रस्ताव स्थगित
वाशी, ता. २४ (बातमीदार) : सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्रमांक ४ येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेत फेरबदल करण्यात यावा, हा प्रस्ताव सोमवारी (ता. २३) महासभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी भूमिका घेतली आहे. महापौरांनी आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव नियोजन आणि चर्चेसाठी पाठवत प्रस्तावाला स्थगिती दिली आहे.
पालिकेचे सदस्य भरत भोईर यांनी बेलापूर सेक्टर १५, भूखंड क्रमांक ४ येथे प्रस्तावित शासकीय सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या जागेत फेरबदल करण्याबाबत किंवा प्रस्ताव रद्द करण्याबाबत महासभेत ठराव मांडण्यात आला होता. बेलापूर रुग्णालयाकरिता प्रस्तावित जागेचा वापर खेळाडू करतात. ४० पेक्षा क्रीडा संघटना या मैदानाचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या पर्यावरणाला जोपासण्याचे काम या मैदानामुळे झाले आहे. असे असताना या मैदानावर रुग्णालय उभारून खेळाडूंच्या हक्कावर गदा आणू नये, अशी भूमिका सभागृहात सदस्यांनी व्यक्त केली. १४ गावांतील नागरिक व नगरसेवक भरत भोईर यांनी १४ गावांमध्ये सरकारची जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, त्या ठिकाणी रुग्णालय उभारण्याच्या अनुषंगाने मागणी सभागृहात केली आहे.
भाजपच्या सलुजा सुतार, निशांत भगत, सूरज पाटील, गणेश सकपाळ, नगरसेविका भारती पाटील यांनीदेखील खेळाडूंसाठी मैदान आरक्षित राहावे, अशी भूमिका मांडली. तसेच मैदानात उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाला विरोध केला असून, हे रुग्णालय फक्त दुसऱ्या ठिकाणी उभारावी, अशी मागणी सभागृहात केली आहे.
मैदाने वाचविणे हे आपले कर्तव्य आहे. खेळाडूंच्या भावना आणि मैदानाची गरज याबाबतचे पत्र आमदार मंदा म्हात्रे यांना पाठवण्यात येणार आहे. बेलापूरच्या खेळाडूंसाठी आरक्षित असणाऱ्या मैदानाची जागा इतर ठिकाणी करावी, या अनुषंगाने त्यांच्याकडे विनंती केली जाणार आहे. हा प्रस्ताव आरोग्य समितीकडे पाठवण्यात येणार असून, त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत त्याला स्थगित ठेवण्यात आले आहे.
- सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई महापालिका
नवी मुंबईची पर्यावरणपूरक मैदानाचे शहर म्हणून ओळख आहे. त्या शहरातील भूमिपुत्रांनी जमिनी सिडकोला दिल्या आहेत. त्यानंतर आता नागरी सुविधांसाठी आरक्षित असणारे सामाजिक सुविधांचे भूखंड सिडकोला दिले आहेत. आरोग्य ही प्राथमिक गरज असली तरी रुग्णालयासाठी मैदाने संपवायचे का?
- दशरथ भगत, उपमहापौर, नवी मुंबई
शहर विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित जागेवर रुग्णालयाकरिता आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षण बदलण्याच्या अनुषंगाने सिडकोकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून जी रुग्णालये उभारण्यात आली आहेत त्यांना सुविधांनी परिपूर्ण करण्यावर पालिकेचा भर असणार आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

