आदिवासी दुर्गम भागाकडे प्रशासनाचा कानाडोळा,
आदिवासी दुर्गम भागाकडे प्रशासनाचा कानाडोळा
रस्ते कामी पाच वर्षांपूर्वीचे पाच कोटी निधी खर्चाविना पडून
रोहा, ता. २३ (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासकीय अनास्थेचा मोठा फटका बसत आहे. आदिवासी भागातील रस्त्यांसाठी २०२१-२२ या वर्षात मंजूर झालेला पाच कोटींचा निधी खर्चाविना तिजोरीत पडून आहे. यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
रोहे तालुक्यातील चणेरे-बिरवाडी-गायचोळवाडी-तांबडी-सवाणे-मोहरे हा डोंगराळ आणि दुर्गम भाग आजही मूलभूत सोयींपासून वंचित आहे. यासाठी चणेरा बिरवाडी तांबडी मार्गे रोहा रस्त्याला शासनाने पाच कोटींचा निधी २०२१-२२ मध्ये मंजूर केला होता. याअंतर्गत रस्त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १२ आदिवासी व ठाकूरवाड्या आणि दुर्गम गावांना दळणवळणाचे साधन जवळच उपलब्ध होणार आहे. मात्र, हा निधी वापराविना तिजोरीत पडून आहे. पाच वर्षे होऊनही अद्याप या कामाला मुहूर्त सापडला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले होते. परंतु, अधिकारीवर्ग या कामाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी दिला आहे.
पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला फटका
चणेरा बिरवाडी तांबडी मार्गे रोहा रस्ता कोकणातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे रोहा रेल्वे स्थानक ते अलिबाग, नागाव, रेवदंडा, मुरूड आणि फणसाड अभयारण्य, कोर्लई किल्ला, काशिद बीच यांसारख्या पर्यटनस्थळांचे अंतर १० किमीने कमी होणार आहे. यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ऐतिहासिक बिरवाडी किल्ल्यावर जाणे सुलभ होईल.
रस्ते कामाला मुहूर्त का नाही
या रस्ते कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या नियोजित रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे म्हणून अनेकदा आंदोलन केली आहेत. मात्र, प्रशासनाला जाग आलेली नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश विचारे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी माहिती अधिकाराखाली उप विभागीय अभियंता यांच्याकडेही माहितीची मागणी केली होती. परंतु, सात महिने उलटूनही ही माहिती उपलब्ध झालेली नाही. यामुळे रस्ते कामाला मुहूर्त का सापडत नाही, असा प्रश्न प्रकाश विचारे यांनी उपस्थित केला आहे.
फोटो कॅप्शन :
रोहा ः रस्त्याची झालेली दुर्दशा दिसून येत आहे.

