पाणीबाणीवरून राजकारणही तापले
उल्हासनगर, ता. २४ (बातमीदार) : शहरातील वाढत्या पाणीटंचाईमुळे उल्हासनगरचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा ऐरणीवर आला. नागरिकांना भेडसावणारी पाण्याची कमतरता, दूषित पाण्याचा पुरवठा, गळती तसेच फुटलेल्या वाहिन्यांच्या समस्यांवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. हा प्रकार गांभीर्याने घेत अश्विनी निकम यांनी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पाणीबाणीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका शिवसेना गटनेते अरुण आशान यांनी दिली.
महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पाणीटंचाईचा मुद्दा जोरदार उपस्थित करण्यात आला होता. अनेक प्रभागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तसेच काही भागांत दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. अधिकाऱ्यांच्या कथित गैरजबाबदार भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका सभागृहात महापौर अश्विनी निकम व उपमहापौर अमर लुंड यांच्या पुढाकाराने जनप्रतिनिधी व पाणी विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीला महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे उपस्थित होत्या.
बैठकीदरम्यान विविध प्रभागांतील जुन्या व जीर्ण वाहिन्यांमुळे होणारी गळती, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि दूषित पाण्याच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरात लवकर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपमहापौर लुंड यांनी दिली. दरम्यान, उल्हासनगर पूर्वेतील कॅम्प क्रमांक ४ व ५ परिसरात पाणीपुरवठ्यातील अनियमितता व कमी दाबाच्या तक्रारी अधिक असल्याने शिवसेनेचे अरुण आशान, शेखर यादव, अमर जग्यासी, साक्षी सुर्वे, इंदिरा पाटील, संगीता सपकाळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे विकास खरात यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
उल्हासनगर : महापौर अश्विनी निकम, शिवसेना गटनेते अरुण आशान, नगरसेविका साक्षी सुर्वे यांची संयुक्त बैठक झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

