लोकल प्रवाशांचा जीव धोक्यात

लोकल प्रवाशांचा जीव धोक्यात

Published on

उंच-सखल फलाटामुळे अपघाताची भीती
डोंबिवली स्थानकात प्रवाशांचा जीव धोक्यात

डोंबिवली, ता. २४ : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीत प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर करण्यात आलेली डागडुजी प्रवाशांसाठी सोयीची ठरण्याऐवजी जीवघेणी ठरत असून, रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

फलाट क्रमांक ५ वर प्रवाशांच्या चालण्याच्या सुविधेसाठी सिमेंट टाकून लादी बसवण्याचे काम नुकतेच करण्यात आले. मात्र, हे काम अत्यंत घाईघाईत आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने झाल्याचे दिसून येत आहे. लादी बसवताना समतोल न राखल्याने फलाटावर ठिकठिकाणी उंच-सखल भाग तयार झाले आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी घाईत असलेल्या प्रवाशांचा पाय अडकून किंवा तोल जाऊन पडण्याचे प्रकार वाढले आहेत.

बॅगा घेऊन चालणारे प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना या ''अडथळा शर्यती''मुळे चालणे कठीण झाले आहे. लोकल पकडण्यासाठी धावताना प्लॅटफॉर्मवरील या उंच-सखल भागामुळे अनेकदा प्रवाशांची धडपड होते. धक्का-बुक्कीमध्ये कुणी ट्रॅकवर पडल्यास याला जबाबदार कोण? प्रशासनाने तातडीने दर्जा सुधारावा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी देत आहेत.

महसूल कोट्यवधींचा, सुविधा मात्र नावालाच!
डोंबिवली स्थानकातून रेल्वेला दररोज तिकीट आणि पास विक्रीतून प्रचंड महसूल मिळतो. मात्र, प्रवाशांच्या वाट्याला केवळ गर्दी आणि निकृष्ट पायाभूत सुविधाच येत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. केवळ नावापुरती दुरुस्ती न करता, तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि दर्जेदार काम करावे, अशी आग्रही मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com