महापौर निवडीनंतर अन्य पदांची उत्सुकता
पनवेल, ता. २४ (बातमीदार) : पनवेल महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता सत्तेच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, तसेच तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदाची निवड ५ मार्चला अपेक्षित आहे. भाजपकडे अर्ध शतकाहून अधिक सदस्यसंख्या आणि स्पष्ट बहुमत असल्याने या सर्व पदांवर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्याच हातात राहणार आहे.
महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची सव्वा वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. गटनेतेपदाची जबाबदारीही नितीन पाटील यांच्याकडेच असल्याने पुढील सत्ताकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. महापालिकेच्या मागील टर्ममध्ये परेश ठाकूर यांनी सभागृह नेतेपद सांभाळले होते; मात्र यंदा त्यांनी निवडणूक लढवलेली नसल्याने नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बिनेदार, ॲड. मनोज भुजबळ आणि अमर पाटील यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. अनुभवी व संघटनाशी जवळीक असलेल्या बिनेदार यांना आघाडी मिळू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरुवातीला अरविंद म्हात्रे यांना संधी दिली जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानंतर हरेश केणी यांचाही पर्याय पुढे येऊ शकतो. विरोधी बाकांवरून प्रभावी आवाज देण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची निवड होईल, अशी अपेक्षा आहे.
भाजपच्या एकहाती सत्तेमुळे औपचारिक निवड प्रक्रियेपेक्षा पक्षांतर्गत समीकरणे आणि संतुलन अधिक निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे ५ मार्चला कोणाच्या हाती सभागृहाचे नेतृत्व आणि तिजोरीच्या चाव्या जातात, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समिती सभापतिपदासाठी अनेक पर्याय
महापालिकेच्या कारभारात आर्थिक अधिकारांच्या दृष्टीने स्थायी समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या पदासाठी समीर ठाकूर, डॉ. कविता चौतमोल, विकास घरत आणि प्रवीण पाटील यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडे पर्यायांची रेलचेल असल्याने अंतिम क्षणापर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.
आमदारांच्या सूचनांनुसार शिक्कामोर्तब
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांनुसार व पक्ष नेतृत्वाच्या निर्णयानुसारच या पदांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ मार्च हा दिवस पनवेलच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पदासाठी सुशिक्षित व कार्यक्षम महिला सदस्याची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

