बदलापुरात स्त्री बीज तस्करीचा पर्दाफाश; सोनोग्राफीसाठी मदत करणारी तरुणी गजाआड

बदलापुरात स्त्री बीज तस्करीचा पर्दाफाश; सोनोग्राफीसाठी मदत करणारी तरुणी गजाआड

Published on

बदलापूर स्त्रीबीज तस्करीत चौथी अटक
सोनोग्राफीसाठी मदत करणारी तरुणी गजाआड
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) ः बदलापुरात उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पोलिसांनी चौथी अटक करत तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणात सोनल गरेवाल (वय २४) या तरुणीला उल्हासनगर येथून अटक करण्यात आली. सोनोग्राफी करण्यासाठी मुख्य आरोपी महिलांना ती मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केल्यानंतर या महिलेला आज अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आले, तिला शुक्रवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात तीन महिला आरोपींना अटक केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत ही चौथी अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या सोनल गरेवालच्या घरातून मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. तिच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही ती या बेकायदेशीर कृत्याला हातभार लावत असल्याचे समोर आले आहे. सोनोग्राफी करणारी ही महिला, पीडित महिलांना स्त्रीबीज तयार करण्यासाठीचे इंजेक्शन दिल्यानंतर, १० दिवसांच्या त्या प्रक्रियेत दोन ते तीन वेळा बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी करून, हे स्त्रीबीज कितपत तयार झाले आहे, याची तपासणी करत होती.

वैद्यकीय वस्तूंचा साठा
स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सातत्याने नवे धागेदोरे समोर येत असून, या रॅकेटचा आवाका किती मोठा आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. याच प्रकरणात आतापर्यंत चार ते पाच ठिकाणी छापे मारण्यात आले असून, या प्रत्येक ठिकाणी बेकायदेशीर वैद्यकीय वस्तूंचा साठा सापडला आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे तपास जोरदार सुरू असून, या प्रकरणात आणखी आरोपींची नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिलांच्या खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल उघड!
बदलापुरातील स्त्रीबीज बेकायदेशीर विक्री प्रकरणाचा तपास अधिक गंभीर व व्यापक होत आहे. आरोपींच्या दूरध्वनी व इतर तपासणीत आर्थिक व्यवहारांचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. पोलिसांना आरोपींकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे फोटो तसेच बँकेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत. महिलांच्या बँक खात्यांमधून कधी ११, ३० तर कधी २३ लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलांची खाती वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल केल्याची शक्यता असून, याचासंबंध डॉक्टर, हॉस्पिटल किंवा आयव्हीएफ सेंटरशी आहे का, याचा तपासही करण्यात येत आहे. आर्थिक व्यवहारांच्या आधारे संपूर्ण रॅकेटचा आर्थिक मागोवा घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सखोल तपास करत असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com