रुग्णालयावरून शाब्दिक लढा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेरूळ येथील रुग्णालयाचा फेरबदल प्रस्ताव स्थगित करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली आहे. या प्रस्तावानंतर आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी (ता. २४) पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. १४ गावांतील नगरसेवक भरत भोईर यांच्याआडून विरोध करण्यापेक्षा समोर येऊन उघडपणे लढून दाखवा, असे आव्हान म्हात्रे यांनी नाईक समर्थकांना दिले. बेलापूर आणि नेरूळमध्ये मैदाने असतानाही मैदानाचा अट्टहास करणाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप म्हात्रे यांनी केले. त्यामुळे आमदारांच्या आरोपामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘म्हात्रे विरुद्ध नाईक’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
नेरूळ येथील सुमारे आठ एकरांच्या भूखंडावर मंदा म्हात्रे यांनी सरकारदरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. या भूखंडासाठी महापालिकेने सिडकोला पैसे भरले असून, आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी (ता. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत रुग्णालयाच्या प्रकल्पाऐवजी मैदान असावे, असा फेरबदल करण्याबाबतचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी आणला होता. यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईत संतापाची लाट उसळली होती.
फेरबदल करण्याचा ठराव चर्चेसाठी येणार होता त्याच दिवशी मैदानाकरिता आग्रही असणाऱ्या लोकांनी महापालिका प्रशासनावर मोर्चादेखील आणला होता. परंतु यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे रुग्णालयाच्या प्रकल्पात कोणताही फेरबदल करू नये, अशा आशयाचे पत्र सत्ताधारी आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना आल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे फेरबदल करण्याचा ठराव रद्द करण्याऐवजी आरोग्य विभागाकडे अभ्यास करण्यासाठी पाठवण्याची नामुष्की यांच्यावर ओढावल्याची टीका म्हात्रे यांनी केली.
पैसे खाण्यासाठी रुग्णालयाला विरोध
नेरूळ येथे सिडकोच्या भूखंडावर काही लोकांमार्फत क्रिकेटचे सामने भरवले जात आहेत, परंतु आता या मैदानाचा क्रिकेटचे सामने भरवण्यापुरते वापर होत नसून, मैदानावर कॉर्पोरेट कंपन्यांच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी लाखो रुपये वसूल करण्यासाठी वापर होत आहे. परंतु आता या मैदानावर रुग्णालय उभारल्यानंतर पैसे वसुलीचा गोरखधंदा थांबणार आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या रुग्णालयाला विरोध होत असल्याचा आरोप आमदार म्हात्रे यांनी केला आहे.
माझ्या नादाला लागणाऱ्याला सोडणार नाही!
कोरोना काळात आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्यामुळे लोकांनी आपले नातेवाईक गमावले. त्याकरिता चांगले रुग्णालय आपल्या शहरात निर्माण व्हावे, म्हणून मी झगडते आहे. अशा परिस्थितीत माझ्या कामात अडथळे आणतात. माझ्या नादाला लागणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा खरमरीत इशारा म्हात्रे यांनी दिला.
नगरसेवकांची बेकायदा बांधकामे रडारवर
आता निवडून आलेल्या नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाइकांनी महापालिका तसेच सिडकोच्या जागेवर अनधिकृत बांधकामे केली आहेत. माझ्या रुग्णालयाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांची यादी माझ्याकडे आहे. येत्या अधिवेशनात बेकायदा बांधकामांवर कशी कारवाई होत नाही हेच पाहाते, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

