भाजप प्रदेश कार्यकारिणीत आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीस पदाची मोठी जबाबदारी
भाजप प्रदेश कार्यकारिणीत
आमदार ठाकूर चिटणीसपदी
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २४ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. या प्रदेश कार्यकारिणीत आमदार प्रशांत ठाकूर यांना चिटणीस पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली.
आमदार निरंजन डावखरे, आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावरही पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून, यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर टाकण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत प्रदेश कार्यकारिणीतील नावांची घोषणा केली. पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण म्हणाले, की काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वाने माझ्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतरच्या काळात निवडणूक आचारसंहिता आणि एकापाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकारी नेमणुका या निवडणुकीनंतर कराव्यात, असा निर्णय भाजपच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी घेतला होता. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मंडळींसोबत चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. आज पदाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक होणार आहे, त्याव्यतिरिक्त असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, ज्यांना प्रदेश कार्यकारिणीत संधी देता आली नाही. परंतु भाजप आणि वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी कशी देता येईल याचा सर्वांगीण विचार माझ्यासह सर्व पदाधिकारी नक्की करू, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. या नियुक्तीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

